चिंचवडमध्ये दोन गटात तुफान हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 13:47 IST2025-12-06T13:47:14+5:302025-12-06T13:47:22+5:30
या घटनेत परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

चिंचवडमध्ये दोन गटात तुफान हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे दाखल
पिंपरी : चिंचवड येथील एसकेएफ कंपनीजवळील हॉटेलसमोर गुरुवारी (दि. ४) मध्यरात्री दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीने हिंसक रूप धारण केले. या घटनेत परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पहिल्या प्रकरणात फिर्यादी आदित्य दिनकर चिंचवडे (वय २२, रा. लिंकरोड, चिंचवड) यांनी बसवराज शंकर हेळवे उर्फ बश्या (२८, रा. चिंचवडेनगर, चिंचवड), शुभम दत्तात्रय शिंदे (२२, रा. शिवनगरी, चिंचवड), शाम शंकर कोळी (२१, शिरगाव, ता. मावळ) व इतर दोन जणांनी त्यांच्याकडून दर महिन्याला २५ हजार रुपयांचा हप्ता मागितल्याचा आरोप केला आहे. पैसे न दिल्यास जीव घेण्याची धमकी दिल्यानंतर संशयितांनी रस्त्यावर पडलेली काच उचलून त्यांच्या डोक्यावर व कानावर वार करून जखमी केल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणात बसवराज, शुभम, शाम यांच्यासह अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल झाला असून शाम याला अटक करण्यात आली आहे.
दुसऱ्या प्रकरणात फिर्यादी शुभम दत्तात्रय शिंदे यांनी आदित्य दिनकर चिंचवडे, कार्तिक घोडके, शिवम हगवणे (दोघेही रा., वाल्हेकरवाडी), सुनील रामचंद्र चिंचवडे व इतर तिघांवर गंभीर आरोप केले आहेत. रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीशी झालेल्या वादातून हाणामारी झाली. यात बसवराज हेळवे याच्या डोक्यावर काचेने प्राणघातक वार झाल्याचे नमूद आहे. आरोपींनी वायसीएम रुग्णालयापर्यंत पाठलाग करून शिवीगाळ केल्याचे, त्यानंतर दोन वाहनांनी फिर्यादीच्या चारचाकी गाडीला पाठलाग करून धडक दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. दोन्ही बाजूंनी जीवघेणा प्रयत्न, मारहाण, धमक्या व वाहनाचे नुकसान या गंभीर आरोपांसह गुन्हे दाखल झाले आहेत.