पवनानगर : विसापूर किल्ला परिसरात राहणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून छोट्या हॉटेलमागे नेऊन बंदोबस्तावरील पोलिस शिपायाने लैंगिक अत्याचार केला. सचिन वसंत सस्ते (वय ४३, सध्या रा. मुहम्मदवाडी, हडपसर, पुणे. मूळ रा. जेजुरी, पुरंदर) असे त्याचे नाव आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली असून, गुरुवारी त्याला निलंबित करण्यात आले ही घटना बुधवारी (दि. २५) दुपारी चारच्या सुमारास घडली.
लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मायने यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाताळ व नवीन वर्षाच्या आगमनानिमित्त मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पोलिसांकडून जादा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील विसापूर किल्ल्यावरही पुणे ग्रामीण मुख्यालयातून जादा बंदोबस्त मागविण्यात आला होता. त्यानुसार पोलिस कर्मचारी सचिन सस्ते पुणे मुख्यालयातून लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये बंदोबस्ताच्या कामाकरिता आला आहे. त्याची नेमणूक लोहगड-विसापूर किल्ला परिसरात आहे.
सस्ते याने बुधवारी विसापूर किल्ला पायथ्याशी खेळणाऱ्या पाच वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवले. त्या परिसरातील दुकानाच्या मागील निर्मनुष्यस्थळी नेले आणि तिच्यासोबत दारूच्या नशेमध्ये अश्लील चाळे केले. मुलीने हा प्रकार पालकांना सांगितल्यानंतर मुलीच्या नातेवाइकांनी पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी सकाळी सस्ते याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले.