व्यावसायिकाला खाली पाडले, दगड फेकून मारला; अजितदादांच्या निकटवर्तीयावर कारवाई होणार का?
By नारायण बडगुजर | Updated: January 27, 2025 18:18 IST2025-01-27T18:17:23+5:302025-01-27T18:18:11+5:30
आमचा पक्ष असा प्रकार सहन करणार नाही, चांदेरेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो होऊ शकला नाही - अजित पवार

व्यावसायिकाला खाली पाडले, दगड फेकून मारला; अजितदादांच्या निकटवर्तीयावर कारवाई होणार का?
पिंपरी : बांधकाम व्यावसायिकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मुळशी तालुक्यातील सुसगाव येथे तीर्थ डेव्हलपर्सच्या मालकीचा सर्व्हे क्रमांक २७३ येथे शनिवारी (दि. २५) ही घटना घडली.
प्रशांत शंकर जाधव (४८, रा. वारजे माळवाडी, पुणे) यांनी याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बाबूराव चांदेरे व त्याचे दोन ते तीन साथीदारांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तीर्थ डेव्हलपर्सचे विजय रौंदळ असे मारहाण झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.
बावधनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल विभुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबूराव चांदेरे हा पोकलेनच्या साह्याने खोदकाम करीत असल्याची माहिती फिर्यादी प्रशांत जाधव यांना मिळाली. त्यामुळे फिर्यादी जाधव यांनी तेथे जाऊन बाबूराव चांदेरे याच्याकडे विचारपूस केली. तू कोण विचारणारा, असे म्हणून चांदेरे याने फिर्यादी जाधव यांच्या कानशिलात मारले. त्यानंतर विजय रौंदळ यांनी चांदेरे याच्याकडे विचारपूस केली. त्यावेळी चांदेरे हा रौंदळ यांच्या अंगावर धावून गेला. त्यांना ढकलून देऊन खाली पाडले. तसेच चांदेरे याच्यासोबत असलेल्या त्याच्या इतर साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी विजय रौंदळ हे तेथून उठून जात असताना चांदेरे याने दगड फेकून मारला. त्यामुळे रौंदळ यांच्या डोक्यास जखम झाली. पोलिस निरीक्षक तेजस्वी जाधव तपास करीत आहेत.
सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेचे कलम
भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२), १३१ अन्वये पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला. या कलमांनुसार सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा होऊ शकते. सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची कलमे असल्याने या गुन्ह्यात बाबूराव चांदेरे याला अटक करण्यात आली नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
अजित पवारांचे अत्यंत विश्वासू
बाबुराव चांदेरे हे पुणे महापालिकेचे पाचवेळा नगरसेवक राहिले आहेत. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. कोथरूड विधानसभेची निवडणूक देखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली आहे. अजित पवारांचे ते अत्यंत विश्वासू मानले जातात.
उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?
‘‘आमचा पक्ष असा प्रकार सहन करणार नाही. चांदेरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो होऊ शकला नाही. संपर्क साधला आणि एका नातेवाईकाने सांगितले की ते कुठेतरी दूर गेले आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
याप्रकरणी बाबूराव चांदेरे यांना नोटीस दिली आहे. त्यांचा जबाब नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. चांदेरे यांच्या दोन साथीदारांचे फोटो मिळाले आहेत. त्यांची नावे निष्पन्न करण्यात येत आहेत. - अनिल विभुते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बावधन