रेल्वे स्थानकाजवळ सापडले बॉम्ब शिल्ड आणि खळबळ उडाली; पिंपरीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 18:22 IST2025-05-09T18:21:42+5:302025-05-09T18:22:35+5:30
बॉम्ब शोधक नाशक पथकाने बॉम्ब शेलची पाहणी करून ते ताब्यात घेतले आहेत.

रेल्वे स्थानकाजवळ सापडले बॉम्ब शिल्ड आणि खळबळ उडाली; पिंपरीतील घटना
पिंपरी : भारत-पाकिस्तान मध्ये युद्धाचा तणाव वाढत आहे, अशातच पिंपरीतील रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी दुपारी जुने दोन बॉम्ब शेल आढळून आले. पोलिसांची तारांबळ उडाली. बॉम्ब शोधक नाशक पथक दाखल झाले. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.
पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या भंगारच्या दुकानाजवळ शुक्रवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास जुने बॉम्ब शेल आढळून आल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस, बॉम्ब शोधक नाशक पथक आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ धाव घेतली व बॉम्ब शोधक नाशक पथकाने बॉम्ब शेलची पाहणी करून ते ताब्यात घेतले आहेत.
बॉम्बशेल तपासणीसाठी संरक्षण विभागाकडे
पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. मात्र आणखी बॉम्ब शेल अथवा इतर संशयित वस्तू आढळून आल्या नाहीत. आढळलेले बॉम्ब शेल पुढील तपासणीसाठी संरक्षण विभागाकडे दिले जाणार आहे. हे पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात सातत्याने अशा प्रकारचे बॉम्ब शेल आढळून येतात. शुक्रवारी आढळलेले बॉम्ब शेल भांगरमध्ये चोरट्या पद्धतीने आणले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
सोशल मीडियावर चर्चा
सध्या भारत-पाकिस्तान युद्धाचा तणाव वाढत आहे. देशभर सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी उपायोजना केल्या जात आहेत. दोन दिवसांपूर्वी पिंपरी येथे युद्धजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी मॉकड्रील घेण्यात आले. हे मॉकड्रील यशस्वी झाल्यानंतर सर्व यंत्रणा युद्धजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात हे बॉम्ब शेल आढळल्याने आज दुपारी खळबळ उडाली. सोशल मीडियावर छायाचित्र फिरत होती. मात्र, कोणताही धोका नसल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला.