bled attack on two in saloon in old sangvi | केशकर्तनालयातील दोघांवर ब्लेडने वार ; जुनी सांगवी येथील प्रकार

केशकर्तनालयातील दोघांवर ब्लेडने वार ; जुनी सांगवी येथील प्रकार

पिंपरी : तुला माहित नाही का, मी इथला भाऊ आहे, असे म्हणून एकाने केशकर्तनालयातील दोघांवर ब्लेडने वार केले. यात ते दोघे जखमी झाले. तसेच एकाला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. जुनी सांगवी येथे रविवारी (दि. २३) सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. 

मोईन आझादअली खान (वय १८, रा. खडकी लाइन, खडकी बाजार, पुणे) व मुनिर इस्माईल शेख, असे जखमी झालेल्या दांघांची नावे आहेत. तर राज धैर्यसिंग सोमवंशी (रा. मधुबन सोसायटी, जुनी सांगवी) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यातील जखमी तरुण मोईन आझादअली खान यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नितीन लोहकरे (रा. जुनी सांगवी) आणि त्याचे दोन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोईन आणि त्याचा मित्र मुनीर इस्माईल शेख हे दोघेजण शिंदेनगर, जुनी सांगवी येथील केशकर्तनालयात केस कापत होते. त्यावेळी त्यांचा ओळखीचा आरोपी लोहकरे तेथे आला. तो मोईन यास तुझे नाव काय, तू कुठे राहतो, अशी विचारणा करू लागला. त्यावर मुनीर याने काय झाले, अशी विचारणा लोहकरे याला केली. या कारणावरून चिडलेल्या लोहकरे याने ‘तुला माहिती नाही का, मी इथला भाऊ आहे, असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच दुकानातील वापरलेले एका पातीचे ब्लेड घेऊन त्याच्याने मुनीर शेख याच्या मानेवर आणि फिर्यादी मोईन याच्या तळहातावर वार करून जखमी केले. तसेच तेथे असलेल्या राज सूर्यवंशी यांच्याही अंगावर आरोपी धावून गेले. शिवीगाळ करीत आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निकुंभ तपास करीत आहेत.

Web Title: bled attack on two in saloon in old sangvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.