Bharat Ratna should be given to Krantijyoti Savitribai and Mahatma Jyotiba Phule | क्रांतीज्योती सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न द्यावा 
क्रांतीज्योती सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न द्यावा 

पिंपरी  : विचारक, समाजसुधारक, लेखक, सत्यशोधक महात्मा  ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली. लोकसभेच्या शून्य प्रहर चर्चेत त्यांनी सहभाग घेत ही मागणी केली.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, "महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. ते सत्यशोधक समाजाचे प्रणेते होते. फुले यांनी शेतक-यांची परिस्थिती सुधारण्यासाठी सक्रिय काम केले आहे. शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची त्यांनी मांडणी केली. भारतीय विचारक, समाजसुधारक, लेखक अशी त्यांची ओळख आहे. ब्रिटिशकाळात शेतक-यांची बाजू परखडपणे मांडणारे, महिला, विधवांसाठी काम करणारे  फुले एकमेव समाजसुधारक होते.

महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ महात्मा ज्योतिबा फुले यांनी रोवली. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी कठीण परिस्थितीत महिलांना शिक्षण देण्याचे काम केले. महिलांना घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती, त्यांना शिक्षण घेण्याचे स्वतंत्र नव्हते, अशा काळात त्यांनी आपल्या स्वतःच्या घरात शाळा सुरु करून महिलांना साक्षर केले. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोपरांत भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी बारणे यांनी लोकसभेत केली.

Web Title: Bharat Ratna should be given to Krantijyoti Savitribai and Mahatma Jyotiba Phule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.