चिंचवडमध्ये माजी नगरसेवक गणेश लोंढे यांच्यावर प्राणघातक हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 16:33 IST2019-04-05T16:30:32+5:302019-04-05T16:33:53+5:30
चिंचवड येथील तानाजीनगर मध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक गणेश लोंढे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली.

चिंचवडमध्ये माजी नगरसेवक गणेश लोंढे यांच्यावर प्राणघातक हल्ला
चिंचवड : काँग्रेसचे माजी नगरसेवक गणेश लोंढे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना गुरुवारी (दि.४) रात्री साडे नऊच्या सुमारास चिंचवड येथील तानाजीनगरमध्ये घडली.दुचाकी वरून आलेल्या तीन जणांनी धारदार शस्त्रांनी हा हल्ला केल्याची फिर्याद लोंढे यांनी चिंचवड पोलिसांकडे दिली आहे.
चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री लोंढे हे कामानिमित्त त्यांच्या गाडीतून चिंचवड येथे गेले होते. तानाजीनगर येथील शिवाजी उदय मंडळ जवळ आले असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांना अडवले. त्यांना मोटारीबाहेर खेचून धारदार शस्त्राने वार केले.यामध्ये लोंढे जखमी झाले आहेत.त्यांच्या हातावर,तोंडावर व डोक्यावर वार करण्यात आले आहे. लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश घोलप, आकाश घोलप (रा.चिंचवड) सुमित लवे(रा.काळेवाडी) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोंढे यांच्यावर थेरगाव येथील खासगी रुग्णलयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून चिंचवड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
..........
आज होणार होता वाढदिवस साजरा:
आज (दि.५) गणेश लोंढे यांचा वाढदिवस आहे.त्यांच्या कुटुंबीयांनी व मित्र परिवाराने त्यांच्या वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन केले होते.मात्र वाढदिवसाच्या एक दिवस आगोदरच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.