सचिन ठाकर
पवनानगर : वडील आणि भावाचे स्वप्न साकारण्यासाठी मेहनत घेत थायबॉक्सिंगसारख्या आव्हानात्मक क्रीडा प्रकारात तृप्ती शामराव निंबळेने ठसा उमटवला आहे. विविध देशांत झालेल्या थायबॉक्सिंग स्पर्धेत तिने सुवर्णपदकावर नाव कोरले आहे.
तृप्तीला खेळाचे बाळकडू घरातूनच मिळाले. पुणे जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्रातील मल्लसम्राट शामराव निंबळे हे तिचे वडील. आई जिजाबाई गृहिणी, तर भाऊ कुस्ती क्षेत्रातच होता. २०१४ मध्ये भावाचे अपघाती निधन झाले. यामुळे तृप्तीने वडील आणि भावाचे स्वप्न साकारण्यासाठी कठोर मेहनत घेतली. तृप्ती म्हणाली की, मी माझ्या भावाचे आणि वडिलांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी खेळले. यापुढेही असेच खेळत राहून पदके भूषविणार आहे.
तृप्तीला टी. वाय. अत्तार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. मावळ तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील वारू गावातील तृप्तीने २०१७ मध्ये मध्य प्रदेशातील खांडवा येथे झालेल्या थायबाॅक्सिग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता, तर भूतान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. आसाम येथे याच स्पर्धेत तिने रौप्यपदक, तर गोवा येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळविले. अनेक स्पर्धेत तब्बल ६२ पदके मिळविली आहेत.
अधिकाधिक महिलांनी क्रीडा क्षेत्रात यावे
महिलांनी क्रीडा क्षेत्रात देशाचे नाव पुढे न्यायला हवे. मला यापुढे शासकीय अधिकारी होऊन देशसेवा करायची आहे. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. - तृप्ती निंबळे