पोलिसमामा म्हणतात, नवे घर देताय की खुराडे ? ४३० चौरस फुटांच्या घरात आम्ही रहायचे कसे ?
By नारायण बडगुजर | Updated: July 23, 2025 13:38 IST2025-07-23T13:37:35+5:302025-07-23T13:38:18+5:30
- कमी चटई क्षेत्रफळाच्या घरांबाबत पोलिस कुटुंबीयांची नाराजी

पोलिसमामा म्हणतात, नवे घर देताय की खुराडे ? ४३० चौरस फुटांच्या घरात आम्ही रहायचे कसे ?
पिंपरी :पोलिसांना शासकीय, तसेच स्वमालकीची घरे मिळावीत म्हणून शासनातर्फे वेळोवेळी आश्वासन देण्यात येते. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पोलिसांच्या घरांचा प्रश्न कायम आहे. पोलिस वसाहतींमध्ये घरे उपलब्ध करून देण्यासाठी काही ठिकाणी योजना मंजूर करण्यात येत आहेत. मात्र, २०१६ मधील शासनाच्या परिपत्रकानुसार देण्यात येणाऱ्या या घरांचे चटई क्षेत्रफळ कमी असल्याने ही घरे लहान असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे इतक्या लहान घरांमध्ये आम्ही कसे राहायचे, असा प्रश्न पोलिस कुटुंबीयांकडून उपस्थित केला जात आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलिसांना ‘वन आरके’ घरे उपलब्ध करून देण्यात येत होती. त्यामुळे या घरांना पसंती नसल्याने ती पडून राहत होती. पोलिस कुटुंबीय या घरांऐवजी भाडेतत्त्वावरील घरांमध्ये राहणे पसंत करतात. त्यामुळे ‘वन बीएचके’ घरे देण्याबाबत अध्यादेश जारी करण्यात आला. १ डिसेंबर २०१६ रोजीच्या या अध्यादेशानुसार पोलिस दलातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांसाठी ४० चौरस मीटर (४३० चौरस फूट), पोलिस शिपाई, नाईक, हवालदार, सहायक पोलिस उपनिरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक यांच्यासाठी ५० चौरस मीटर (५३८ चौरस फूट), तसेच सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक यांना ६० चौरस मीटर (६४५ चौरस फूट) चटई क्षेत्रफळाची घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पिंपरी-चिंचवड, तसेच इतर महानगरे आणि विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या वसाहतींमध्ये शासनातर्फे या चटई क्षेत्रफळाची घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मात्र, या घरांसाठी आकारण्यात येणारे भाडे आणि सातव्या, तसेच आठव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीनुसार मिळणारा घरभाडे भत्ता यात प्रचंड तफावत राहणार आहे. सध्या प्रशस्त आणि जास्त चटई क्षेत्रफळांच्या घरांना पसंती दिली जात असताना शासनाकडून लहान घरे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पोलिस कुटुंबीयांकडून या शासकीय घरांऐवजी खासगी घरांना पसंती देण्यात येईल. त्यामुळे ही घरे वापराविना पडून राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
घरभाड्यापेक्षा ‘एचआरए’ जास्त
पोलिसांच्या बेसिक वेतनाच्या ३० टक्के रक्कम घरभाडे भत्ता म्हणून दिली जाते. पोलिसांना सध्याच्या वेतनानुसार मिळणारा घरभाडे भत्ता हा खासगी घरभाड्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे जास्त सोयीसुविधा असलेल्या ठिकाणी वास्तव्यास पोलिसांकडून पसंती दिली जाते. परिणामी शासकीय घरे वापराविना पडून राहतात.
जास्त चटई क्षेत्रफळाची घरे द्यावीत
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत सध्या पिंपरी पोलिस वसाहतीच्या पुनर्निर्माणाला मंजुरी मिळाली आहे. तेथे २०१६ च्या शासन आदेशानुसार घरांची उभारणी होणार आहे. मात्र, ही घरे कमी चटई क्षेत्रफळाची राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याऐवजी शासनाने नव्याने अध्यादेश काढून जास्त चटई क्षेत्रफळाची घरे, तसेच पोलिस वसाहतीमध्ये इतर सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पोलिसांकडून होत आहे.
लाइफस्टाइल बदलली, गरजांमध्येही बदल
प्रत्येकाची लाइफस्टाइल बदलली आहे. त्यामुळे व्यायाम, योगा, वाचन, अभ्यासाची खोली यासाठी घरामध्ये पुरेशी जागा असणे आवश्यक आहे. पोलिसांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याने नियमित व्यायाम, योगा करावा लागतो. लहान घरांमध्ये ते शक्य होत नाही.