संतापजनक! आईनेच पोटच्या अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलले; पिंपरीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 20:46 IST2021-07-29T18:46:31+5:302021-07-29T20:46:39+5:30
पिंपरीतील धक्कादायक प्रकार; मुलीच्या आईसहित सर्वांना अटक

संतापजनक! आईनेच पोटच्या अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलले; पिंपरीतील घटना
पिंपरी : आईनेच पोटच्या अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलल्याचा संतापजनक प्रकार समाेर आला आहे. ग्राहकांना अल्पवयीन मुलीचा फोटो दाखवून इतर पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेण्यात येत असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईसह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पिंपरी येथे मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही कारवाई केली.
अजय नारायण माने (वय २२, रा. पिंपरी), ओंकार बाळासाहेब कदम (वय २२, रा. करावागज, ता. बारामती), राकेश रामजीलाल चौधरी उर्फ सहारान (वय ३२), मांगीराम सुरतसिंग बुगालिया (वय ३२, दोघेही रा. निगडी) यांच्यासह अल्पवयीन मुलीची आई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व पाचही आरोपींना पोलिसांनीअटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. २८) फिर्याद दिली.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीची आई व इतर आरोपी अल्पवयीन मुलगी व इतर दोन पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होते. तसेच आरोपी फ्लॅटमध्ये अंमली पदार्थ व दारू बाळगत होते. याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचून कारवाई केली. त्यावेळी फ्लॅटमध्ये ४७६ ग्रॅम गांजा व विदेशी दारुची बाटली बेकायदेशीर बाळगताना आरोपी मिळून आले. तसेच आरोपी राकेश चौधरी व मांगीराम बुगालीया हे दोघे अल्पवयीन मुलीसमोर एका पीडित महिलेसोबत अश्लील चाळे करीत असताना मिळून आले. याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार तसेच अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे तपास करीत आहेत.
अल्पवयीन मुलीच्या फोटोचा वापर
मुलीची आरोपी आई पहिल्या पतीपासून विभक्त राहत आहे. तिला पहिल्या पतीपासून असलेली मुलगी सध्या दहावीत शिकत आहे. त्या मुलीचा फोटो ग्राहकांना दाखवत त्यासाठी मोठी रक्कम सांगितली जात होती. त्यानंतर कमी पैशांमध्ये इतर पीडित महिला पुरविल्या जात होत्या.