अजित गव्हाणे पुन्हा अजित पवार गटाच्या मार्गावर; प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांसोबत झालेली भेट चर्चेची
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 10:21 IST2025-06-14T10:20:13+5:302025-06-14T10:21:23+5:30
पिंपरी : विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षामध्ये प्रवेश केलेले स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांचा गट ...

अजित गव्हाणे पुन्हा अजित पवार गटाच्या मार्गावर; प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांसोबत झालेली भेट चर्चेची
पिंपरी : विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षामध्ये प्रवेश केलेले स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांचा गट समर्थकांसह पुन्हा स्वगृही म्हणजे अजित पवार गटात परतणार असल्याची चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला धक्का बसण्याची चिन्हे आहेत.
लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पराभव झाल्यानंतर भोसरीतून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अजित गव्हाणे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. महायुतीत संधी नसल्याने शरद पवार गटात प्रवेश केला. मात्र विधानसभा निवडणुकीत अपयश आले. पराभवानंतर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने गव्हाणे यांना प्रवेशासाठी खासदार श्रीरंग बारणे आणि सुलभा उबाळे यांच्यामार्फत गळ घातली. तेव्हा गव्हाणे यांनी महामंडळाऐवजी विधान परिषद देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांच्यासोबत असलेल्या माजी नगरसेवकांनी अजित पवार यांच्यासोबतच जावे, असा आग्रह धरला. यादरम्यान अजित पवार गटही सतर्क झाला. गव्हाणे यांचे मन वळविण्यात माजी आमदार विलास लांडे यांनी प्रयत्न सुरू केले. मात्र, याबाबत गव्हाणे यांनी कोणतीही भूमिका घेतली नव्हती.
आता महापालिका निवडणुकीची सज्जता सुरू झाली आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांची गव्हाणे यांनी भेट घेतली. त्यामुळे गव्हाणे स्वगृही परततील अशी चर्चा आहे.
मतदारसंघासह शहरातील विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी मतदारसंघासह शहरातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. आमच्या गटाच्या प्रवेशाबाबत विषय निघाला. लवकरच सर्व सहकारी यांच्याशी बोलून चर्चा केली जाईल. त्यानंतर निर्णय घेऊ. - अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष
विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय परिस्थिती पाहता भोसरीतून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अजित गव्हाणे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. संधी नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. मात्र, विधानसभा निवडणूक झाल्यानंतर त्यांचा गट अजित पवार यांच्या संपर्कात आहे. लवकरच त्यांचा प्रवेश होईल, अशी आम्हाला आशा आहे. - फजल शेख, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट