अजित पवारांनंतर आता PCMC आयुक्त राजेश पाटील यांचे नाव सांगत मागितले पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 17:23 IST2022-01-18T17:09:50+5:302022-01-18T17:23:59+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात फसवणुकीचे प्रकार घडत आहेत....

अजित पवारांनंतर आता PCMC आयुक्त राजेश पाटील यांचे नाव सांगत मागितले पैसे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या छायाचित्राचा व्हॉटस्अप प्रोफाईल म्हणून वापर करुन ऑनलाईन चॅटींगद्वारे नगरसेवक तसेच नागरिकांना फसविण्याचा प्रकार घडला आहे. महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी पोलिसांच्या सायबर सेलकडे फेक आयडी आणि प्रोफाईलचा गैरवापर याबाबत तक्रार नोंदविली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. नगरसेवक आणि अन्य नागरिक यांच्याशी फेक आयडी लावून ऑनलाईन चॅटींग केले जात आहे. तसेच आर्थिक मदतीची विचारणा केली आहे. अज्ञात व्यक्तीने मोबाईल नंबरवरुन व्हॉटस्अपच्या माध्यमातून नगरसेवक आणि अन्य नागरिक यांच्याशी आयुक्ताचा डीपी वापरून, ऑनलाईन चॅटींग केली. आर्थिक मदतीची विचारणा केली. याबाबतचा प्रकार निदर्शनास आल्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
आयुक्त राजेश पाटील म्हणाले, ''फेक प्रोफाईल आयडीद्वारे कोणत्याही स्वरुपाची मागणी केल्यास त्याबाबत पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा. कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करु नये. महापालिकेतील पदाधिकारी, अधिकारी आणि शहरवासियांना कळविण्यात येते की आपल्याला कोणी फेक आयडीवरून फसवणूक होऊ नये, याची दक्षता घ्यावी.''