'मुलगी झाली हो' मालिकेतील कलाकार 'शौनक जहागीरदार' ला एक्सप्रेस हायवेवर लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 12:15 PM2021-05-11T12:15:50+5:302021-05-11T12:15:56+5:30

चारचाकी वाहनाच्या अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल

The actor from the series 'Mulgi Jhali Ho' robbed 'Shaunak Jahagirdar' on the express highway | 'मुलगी झाली हो' मालिकेतील कलाकार 'शौनक जहागीरदार' ला एक्सप्रेस हायवेवर लुटले

'मुलगी झाली हो' मालिकेतील कलाकार 'शौनक जहागीरदार' ला एक्सप्रेस हायवेवर लुटले

Next
ठळक मुद्देसोमाटणे फाटा येथील एटीएममधून ५० हजार रुपये काढण्यास पाडले भाग

पिंपरी: 'स्टार प्रवाह' या मराठी वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतील 'शौनक जहागीरदार' याला अर्थात ती व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्याला रिअल लाईफमध्ये लुटल्याचा प्रकार घडला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर सोमाटणे एक्झिट जवळ शनिवारी (दि. ८) सकाळी पावणे आठच्या सुमारास ही घटना घडली. 

योगेश माधव सोहनी (वय ३२, रा. अंधेरी पूर्व, मुंबई) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. १०) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (शिरगाव चौकी) फिर्याद दिली आहे. त्यानुसार चारचाकी वाहनाच्या अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शिरगाव चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पिंजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता योगेश सोहनी हे एक्सप्रेस हायवे वरून पुण्याकडे जात होते या वेळी सोमाटणे एक्झिटजवळ एक पांढऱ्या रंगाचे काळ्या काचा असलेले चारचाकी वाहन तेथे आले. त्या वाहनाच्या चालकाने हात दाखवून सोहनी यांना थांबण्याचा इशारा केला. त्यामुळे फिर्यादी सोहनी यांनी गाडी थांबवली. तुझ्या गाडी मुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे व एका इसमाला दुखापत झाली आहे. या अपघाताचे कायदेशीर तक्रार पोलिसांकडे करायचे नसेल तर तू एक लाख पंचवीस हजार रुपये नाहीतर तुझ्यावर पोलीस केस होईल, असे सांगून आरोपी वाहन चालकाने फिर्यादी सोहनी यांना भिती दाखवली. तसेच आरोपीने शिवीगाळ करून दमदाटी ही केली. त्यानंतर सोमाटणे फाटा येथील एटीएममधून ५० हजार रुपये काढण्यास भाग पाडून फिर्यादी सोहनी यांच्याकडून ती रक्कम घेऊन निघून गेला. 

दरम्यान, पैसे घेऊन आरोपी लागलीच निघून गेल्याने फिर्यादी सोहनी यांना संशय आला. तसेच काही जणांकडून माहिती घेतली असता एक्सप्रेस हायवेवर अपघात झाला नसल्याचे फिर्यादी सोहनी यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी सोमवारी पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी सुरू केली आहे. 

रिअल लाईफमध्ये फसवणूक

'मुलगी झाली हो' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मोठा टीआरपी असल्याने यातील मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या 'शौनक जागीरदार' ही भूमिका साकारणारा अभिनेता योगेश सोहनी मराठी माणसांच्या घराघरात पोचला आहे. त्याने यापूर्वीही काही वेबसिरीज तसेच मालिकांमध्ये अभिनय केला आहे.

Web Title: The actor from the series 'Mulgi Jhali Ho' robbed 'Shaunak Jahagirdar' on the express highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.