वैमनस्यातून तरुणासह मित्रावर शस्त्राने वार; आंबेगावमधील घटना; चौघे गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 18:54 IST2025-10-29T18:54:38+5:302025-10-29T18:54:57+5:30
- मारहाणीनंतर आरोपींनी रस्त्यावर थांबलेल्या एका तरुणाची दुचाकी घेऊन तिकडून पसार झाले.

वैमनस्यातून तरुणासह मित्रावर शस्त्राने वार; आंबेगावमधील घटना; चौघे गजाआड
पुणे : वैमनस्यामुळे एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना कात्रज भागातील आंबेगाव परिसरात घडली. मारहाणीनंतर आरोपींनी रस्त्यावर थांबलेल्या एका तरुणाची दुचाकी घेऊन तिकडून पसार झाले. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
ही बाब उमेश शिवाजी शिंदे (२६, रहिवासी: सयाजी इस्टेट, बेनकर वस्ती, धायरी) यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये गणेश उदय जाधव (२१, रहिवासी: कृष्णकुंज सोसायटी, स्वामी नारायण मंदिराजवळ, आंबेगाव), समीर दत्ता मरगळे (१९, रहिवासी: भोडे, ता.मुळशी), विशाल विश्वास किलजे (२१, रहिवासी: स्पर्श सोसायटी, नऱ्हे) आणि गौरव गजानन जगताप (२०, रहिवासी: सूर्यव्हिला सोसायटी, नऱ्हे) यांचा समावेश आहे. या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार उमेश शिवाजी शिंदे त्याच्या मित्रासह दुचाकीवरून २७ ऑक्टोबर रोजी रात्री आंबेगाव परिसरातून घरी निघाला होता. त्याच वेळी आरोपींनी त्याला अडवले. काही जुना वाद मिटविण्याच्या नादात आरोपींनी पैशांची मागणी केली. त्यानंतर, आरोपींनी शिंदे आणि त्याचा मित्र प्रदीप जोगदंडे यांच्यावर तीव्र शस्त्राने हल्ला केला. आरोपींनी नाथसृष्टी सोसायटी परिसरात थांबलेल्या दोन तरुणांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या परिसरात थांबलेल्या एका तरुणाची दुचाकी घेऊन आरोपींनी पसार होण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलिस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे पुढील तपास करत आहेत.