टेम्पोच्या धडकेत सात वर्षीय मुलाचा, तर हायवा ट्रकच्या धडकेत ४४ वर्षीय महिलेचा मृत्यू
By नारायण बडगुजर | Updated: November 20, 2025 22:59 IST2025-11-20T22:59:02+5:302025-11-20T22:59:23+5:30
बालेवाडी आणि सुस येथे वेगवेगळ्या अपघातांत सात वर्षीय मुलाचा आणि ४४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. दोन्ही घटना बुधवारी (दि. १९ नोव्हेंबर) घडल्या.

टेम्पोच्या धडकेत सात वर्षीय मुलाचा, तर हायवा ट्रकच्या धडकेत ४४ वर्षीय महिलेचा मृत्यू
- नारायण बडगुजर
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : हिंजवडी आयटी पार्क परिसरात अपघातात तरुणीचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर बावधन परिसरात दोन वेगवेगळे अपघात झाले. बालेवाडी आणि सुस येथे वेगवेगळ्या अपघातांत सात वर्षीय मुलाचा आणि ४४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. दोन्ही घटना बुधवारी (दि. १९ नोव्हेंबर) घडल्या.
बालेवाडी क्रीडा संकुलासमोर म्हाळुंगे पोलिस चौकीजवळ दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या अपघातात अनुराग बाळू चांदमारे (वय ७) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. बंडू किसन वावळकर (वय ५४) आणि अभिनव बाळू चांदमारे (वय ५, दोघेही रा. म्हाळुंगे ता. मुळशी) हे दोघे जखमी झाले आहेत. ऋषिकेश बंडू वावळकर (२५, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडू वावळकर आपल्या नातवंडांना शाळेतून घरी नेत असताना अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या अज्ञात टेम्पोने बंडू किसन वावळकर यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात सात वर्षीय चिमुकला अनुराग चांदमारे याचा मृत्यू झाला. तर बंडू वावळकर आणि पाच वर्षीय अभिनव चांदमारे हे दोघे जखमी झाले.
दरम्यान, सुसगाव स्मशानभूमी येथे सकाळी साडेसातच्या सुमारास अपघात झाला. वैशाली सोमनाथ पाखरे (वय ४४, रा. सूस), असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. काळुराम शंकर शिंदे (३९, रा. सूस, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार हायवा ट्रक खालक सागर लक्ष्मण भालेराव (३८, रा. सूसगाव, ता. मुळशी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सागर भालेराव याच्या ताब्यातील भरधाव हायवा ट्रकने वैशाली पाखरे यांना धडक दिली. या अपघातात वैशाली यांचा मृत्यू झाला.