हॉटेलमधील किचनमध्ये शाॅर्टसर्किटमुळे आग लागून सिलेंडरचा स्फोट; पिंपळे सौदागरमधील घटना
By नारायण बडगुजर | Updated: May 20, 2024 18:37 IST2024-05-20T18:34:30+5:302024-05-20T18:37:05+5:30
पिंपळे सौदागर येथे स्वराज्य गार्डन हाॅटेलमध्ये सोमवारी (दि. २०) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

हॉटेलमधील किचनमध्ये शाॅर्टसर्किटमुळे आग लागून सिलेंडरचा स्फोट; पिंपळे सौदागरमधील घटना
पिंपरी : हाॅटेलच्या किचनमध्ये शाॅर्टसर्किटमुळे आग लागली. यात एका सिलेंडरचा स्फोट झाला. महापालिकेच्या तीन अग्निशामक बंबांच्या साह्याने जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. पिंपळे सौदागर येथे स्वराज्य गार्डन हाॅटेलमध्ये सोमवारी (दि. २०) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील स्वराज्य गार्डन हाॅटेलमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानुसार महापालिकेच्या मुख्य अग्निशामक केंद्राचे तसेच रहाटणी उप केंद्राचे बंब घटनास्थळी दाखल झाले. हॉटेलच्या किचनमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी तीन बंबांच्या साहाय्याने एक तासात आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत एक सिलेंडरचा स्फोट झाला. तसेच जवानांनी तीन सिलेंडर सुरक्षितपणे बाहेर काढले. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, हाॅटेलमधील साहित्याचे नुकसान झाले.
महापालिकेच्या अग्निशामक दलाचे विनायक नाळे, सारंग मंगरूळकर, किरण निकाळजे, रुपेश जाधव, विशाल बाणेकर, कैलास वाघिरे, भूषण येवले, सिद्धेश दरवेश, संदीप डांगे, समीर पोटे, अश्विन पाटील, अक्षय झुरे, प्रतीक खांडगे, ओंकार रसाळ, संकेत घोगरे, सौरभ पारखी यांच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले.