Pimpri Chinchwad | मुंबई पोलीस उपायुक्ताच्या नावे पावणेसहा लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 16:34 IST2023-04-04T16:27:09+5:302023-04-04T16:34:20+5:30
तुमच्या आधारकार्डचा आंतरराष्ट्रीय दहशतवादासाठी गैरवापर होऊ शकतो, असे सांगून...

Pimpri Chinchwad | मुंबई पोलीस उपायुक्ताच्या नावे पावणेसहा लाखांचा गंडा
- नारायण बडगुजर
पिंपरी : मुंबई येथील पोलीस उपायुक्त अजयकुमार बन्सल यांचे नाव वापरून एका महिलेला व्हाॅट्सॲप काॅल केला. तुमच्या आधारकार्डचा आंतरराष्ट्रीय दहशतवादासाठी गैरवापर होऊ शकतो, असे सांगून महिलेकडून पाच लाख ८९ हजार ९५६ रुपये ट्रान्सफर करून घेतले. रावेत येथे २७ मार्च २०२३ रोजी सव्वापाच ते साडेसात या कालावधीत हा प्रकार घडला.
रमा विजय खंडकर (वय ३१, रा. रावेत) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. ३) रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दीली. त्यानुसार एका मोबाइल फोन क्रमांक धारकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला फोन करून तो आयपीएस अधिकारी अजयकुमार बन्सल बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांच्या आधार कार्डच्या नंबरचा व आधार कार्डच्या फोटोचा आंतरराष्ट्रीय दहशतवादासाठी गैरवापर होऊ शकतो. तुमच्या बँक खात्यावरून सहा व्यवहार झाले असून, त्यांचा गैरवापर झाला आहे, असेही फोनवरून आरोपीने सांगितले. महिलेचा विश्वास संपादन करून संशयित सहा व्यवहारांची तपासणी करण्यासाठी प्रत्येकी ९८ हजार ३२६ रुपये ‘सिक्युरिटी’ म्हणून मागितले. त्यानंतर पाच लाख ८९ हजार ९५६ रुपये दोन बँक खात्यांवर ट्रान्सफर करण्यास महिलेला भाग पाडले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
अजयकुमार बन्सल हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी गडचिरोली येथे काही वर्ष काम केले. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असताना गेल्यावर्षी त्यांची बदली झाली. सध्या ते मुंबई येथे पोलीस उपायुक्त आहेत.