पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ५८ टक्के मतदान; १२६ जागांवरील ६९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 23:22 IST2026-01-15T23:20:36+5:302026-01-15T23:22:17+5:30
ईव्हीएममध्ये बिघाड, मोबाइल बंदी व मतदार यादीतील गोंधळाने मतदारांचा

पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ५८ टक्के मतदान; १२६ जागांवरील ६९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत गुरुवारी (दि. १५) सरासरी ५८ टक्के मतदान झाले. महापालिका निवडणुकीत ३२ प्रभागांतील १२८ जागांपैकी दोन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे उर्वरित १२६ जागांसाठी एकूण ६९२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य मतदान यंत्रात (ईव्हीएम) बंद झाले. आज (शुक्रवारी) आठ केंद्रांवर मतमोजणी होणार आहे.
महापालिका क्षेत्रात एकूण १७ लाख १३ हजार ८९१ मतदार असून त्यात ९ लाख ५ हजार ७२८ पुरुष, ८ लाख ७ हजार ९६६ महिला व १९७ इतर मतदारांचा समावेश आहे. एकूण २,०६७ केंद्रांवर मतदान झाले. सकाळच्या टप्प्यात मतदारांचा प्रतिसाद कमी होता. मात्र, सकाळी नऊनंतर मतदानाचा टक्का हळूहळू वाढत गेला. काही ठिकाणी तांत्रिक अडथळे आणि प्रशासकीय गोंधळाचे प्रसंग घडले असले तरी संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली.
मतदान यंत्रात बिघाड
सकाळी ७:३० वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. मात्र, सकाळच्या सुरुवातीच्या टप्प्यात नेहरूनगर, सांगवी, भोसरी, मोशी, चिखली, निगडी आणि चिंचवडगाव येथील काही मतदान केंद्रांवर ईव्हीएममधील मॉक पोल व तांत्रिक कारणांमुळे अडथळे आले. त्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबवावी लागली. निवडणूक प्रशासनाने तात्काळ पर्यायी यंत्रे उपलब्ध करून देत मतदान सुरळीत केले.
काही ठिकाणी तणाव
मतदान केंद्रांमध्ये मोबाइल फोन नेण्यास घातलेल्या बंदीवरून काही ठिकाणी वादाचे प्रसंग घडले. मतदानासाठी आलेल्या काही मतदारांनी मोबाइल सोबत नेण्यास परवानगी देण्याची मागणी केली. मात्र, निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदान केंद्राच्या आत मोबाइल नेण्यास मनाई असल्याचे स्पष्ट करत कर्मचाऱ्यांनी नियमांची अंमलबजावणी केली. काही ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली.
शुक्रवारी मतमोजणी
महापालिका निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी (दि. १६) सकाळी १० वाजता सुरु होणार असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली. महापालिका हद्दीतील निश्चित केलेल्या आठ ठिकाणी मतमोजणी होणार असून मतमोजणी केंद्रांवर ओळखपत्र असलेल्या अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. मतमोजणीदरम्यान वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था तसेच प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. निकाल जाहीर करताना संगणकीय प्रणालीद्वारे अचूकता व पारदर्शकता राखली जाणार आहे.