निगडी येथे वृद्ध महिलेला धाक दाखवून पळविला ४ लाख ३० हजारांचा ऐवज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 20:27 IST2020-08-11T20:25:30+5:302020-08-11T20:27:13+5:30
फिर्यादी वृद्ध महिलेचा मुलगा नोकरीनिमित्त परदेशात वास्तव्यास आहे...

निगडी येथे वृद्ध महिलेला धाक दाखवून पळविला ४ लाख ३० हजारांचा ऐवज
पिंपरी : घरात एकट्या असलेल्या वृद्ध महिलेला धाक दाखवून धक्काबुक्की केली. त्यानंतर त्यांच्या अंगावरील तसेच घरातील दागिने व रोकड असा चार लाख ३० हजारांचा ऐवज चोरट्यांनीचोरून नेला. निगडी प्राधिकरण येथे सोमवारी (दि. १०) रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.
हेमलता मलगौडा पाटील (वय ७६, रा. पहिला मजला, गायत्री हेरीटेज, सेक्टर नंबर २४, प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हेमलता यांचा मुलगा नोकरीनिमित्त परदेशात वास्तव्यास आहे. तसेच त्यांची मुलगी व जावई सेक्टर २५ येथे राहतात. त्यामुळे हेमलता त्यांच्या घरात एकट्याच राहतात. सोमवारी रात्री साडेदहानंतर हेमलता टीव्ही पाहत होत्या. त्यावेळी त्यांच्या फ्लॅटच्या मागच्या बाजूचा दरवाजा उघडा होता. त्यामुळे त्यांच्या घरामागील गार्डनमधून पहिल्या मजल्यावर चढून दोन अनोळखी चोरटे मागच्या दरवाजातून हेमलता यांच्या घरात घुसले. त्यानंतर हेमलता यांना धाक दाखवून व धक्काबुक्की करून चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील व घरातील दागिने तसेच रोकड असा चार लाख ३० हजारांचा ऐवज चोरून नेला.
दोन्ही चोरटे चेहऱ्यावर मास्क बांधून आले होते. तसेच त्यांनी धक्काबुक्की केल्याने हेमलता घाबरल्या होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. याबबात माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपींच्या शोधार्थ पोलिसांची पाच पथके रवाना करण्यात आली आहेत. निगडी पोलीस तपास करीत आहेत.