पिंपरीत वर्षभरात जबरी चोरीचे ३४९ गुन्हे : कामगार, वाहनचालकांनाही लुबाडले जातेय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 19:13 IST2020-12-29T18:42:50+5:302020-12-29T19:13:54+5:30
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत यंदा जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान जबरी चोरीचे ३३० गुन्हे

पिंपरीत वर्षभरात जबरी चोरीचे ३४९ गुन्हे : कामगार, वाहनचालकांनाही लुबाडले जातेय
नारायण बडगुजर-
पिंपरी : कामगार, वाहनचालक, पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्याकडील सोनसाखळी, दागिने, रोकड, मोबाईल आदी मौल्यवान वस्तू हिसकावून चोरटे पळून जात आहेत. काही प्रकारांमध्ये मारहाण करून जखमी करून लुटमार केली जात असल्याचे गुन्हे घडले आहेत. यंदा वर्षभरात जबरी चोरीचे ३४९ गुन्हे दाखल झाले आहेत. लुटमारीच्या या प्रकारांमुळे शहरवासीयांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत स्ट्रीट क्राईम वाढतच आहे. विविध उपाययोजना करून शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश प्रयत्नशील आहेत. सराईत गुन्हेगारांना हद्दपार करून कायदेशीर कारवाई केली जात आहे. गस्तीवर भर देण्यात येत आहे. मात्र तरीही गुन्हे घडतच आहेत. चोरटे भर रस्त्यात धुमाकूळ घालून मारहाण करून जबरी चोरी करतात.
कंपनीतून कामावरून सुटून घरी जात असलेल्या कामगारांना रस्त्यात अडवून मारहाण केली जाते. तसेच त्यांच्याकडील मोबाईल, रोकड आदी ऐवज लंपास केला जात आहे. तसेच फोनवर बोलत असलेल्या पादचाऱ्यांच्या हातातून मोबाईल हिसकावून नेल्याचेही प्रकार घडले आहेत. महिलांची सोनसाखळी हिसकावून नेण्याचे प्रकार पुन्हा वाढत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जबरी चोरीचे गुन्हे कमी झाले आहेत. कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे नागरिक घरातच असल्याने गुन्हे कमी झाले. मात्र लॉकडाऊन शिथिल होताच पुन्हा रस्त्यावर येऊन चोरट्यांनी त्यांचे ह्यउद्योगह्ण सुरू केले आहेत.
पिस्तूल, कोयत्याचा दाखविला जातो धाक
पिस्तुलाचा धाक दाखवून जबरी चोरी करण्याचा प्रकार देखील उघडकीस आला. ३ डिसेंबर रोजी चाकण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांचे धाडस वाढल्याचे यावरून दिसून येते. कोयता, पिस्तूल अशा हत्यारांचा वापर करून नागरिकांना लुटण्याचा प्रकार होत आहे.
एकाच दिवशी पाच गुन्हे दाखल
चोरट्यांनी धुमाकूळ घालून भर रस्त्यात चोरीचे प्रकार केले. जबरी चोरी प्रकरणी २५ डिसेंबर रोजी भोसरी, दिघी, चिखली या पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येकी एक तर चिंचवड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. अशाच प्रकारे जबरी चोरीच्या घटना होऊन २० डिसेंबर रोजी चिंचवड, निगडी व चाकण पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण तीन गुन्हे दाखल झाले.
वर्षभरात २६१ गुन्हे उघडकीस
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत यंदा जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान जबरी चोरीचे ३३० गुन्हे दाखल झाले. यातील २६१ गुन्हे उघडकीस आले. तसेच १ ते २७ डिसेंबर दरम्यान १९ गुन्हे दाखल झाले. तर गेल्या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान ६६६ गुन्हे दाखल झाले होते. यापैकी ४६६ गुन्हे उघडकीस आले होते. याच कालावधित यंदा सोनसाखळी चोरीचे २१ गुन्हे घडले. त्यातील केवळ पाच गुन्हे उघडकीस आले. तर गेल्यावर्षी ७२ गुन्हे दाखल होऊन ४१ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते.
गस्त पथकांची आवश्यकता
जबरी चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांची गस्त वाढणे आवश्यक आहे. मात्र मनुष्यबळ कमी असल्याने पोलिसांवर अतिरिक्त ताण येतो. मनुष्यबळ उपलब्ध झाले पाहिजे. तसेच गस्तीसाठी पथके तैनात करून रस्त्यावर पोलिसांची उपस्थिती आवश्यक आहे. जेणेकरून गुन्हे रोखण्यास मदत होईल