जिथे भारत-चीनचे जवान भिडले, त्या गलवान व्हॅलीतील युद्धभूमीवर पर्यटकांनाही जाता येणार; जाणून घ्या कसं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 20:00 IST2025-01-15T19:50:10+5:302025-01-15T20:00:12+5:30

bharat ranbhoomi darshan: केंद्रीय पर्यटन मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय यांच्या समन्वयातून युद्धभूमी पर्यटन सुरू करण्याच्या दिशेने पावले टाकण्यात येत आहे.

आतापर्यंत साहसी पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, सागरी पर्यटन, क्रीडा पर्यटन असे वेगवेगळ्या स्वरुपाचे पर्यटन तुम्ही केले असेल वा ऐकले असेल. पण, यात आता युद्धभूमी पर्यटनही जोडला जाणार आहे.

१५ जानेवारी ७७वा लष्कर दिवस आहे. या निमित्ताने भारतीय लष्कराकडून भारत युद्धभूमी दर्शन म्हणून सुरूवात करण्यात येणार आहे.

नव्या स्वरुपाच्या पर्यटनाला चालना देण्याची योजना आहे. भारत युद्धभूमी दर्शनमध्ये ७७ अशा ठिकाणांचा समावेश केला जाणार आहे, जिथे मागील काही वर्षात कुठल्या ना कुठल्या स्वरुपाचा लष्करी संघर्ष झाला आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, युद्धभूमी पर्यटन ठिकाणांमध्ये गलवान व्हॅलीचाही समावेश करण्यात आला आहे. याच गलवान व्हॅलीत जून २०२० मध्ये भारत आणि चीनच्या जवानांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता.

गलवान व्हॅलीत झालेल्या या संर्घषात भारताचे २० जवान शहीद झाले होते. गलवान व्हॅलीत केंद्र शासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये येते. हा भाग अक्साई चीनला लागून आहे, त्यामुळे या भागातील सुरक्षा नेहमी महत्त्वाची राहिली आहे.

भारत युद्धभूमी दर्शनमध्ये गलवान व्हॅलीबरोबरच डोकलाम, द्रास, कारगिल, सियाचीन बेस कॅम्प, लाँगेवाला (राजस्थान), बम ला आणि अरुणाचल प्रदेशातील किबिथू या युद्धभूमींचा समावेश आहे.

भारत युद्धभूमी दर्शनसाठी वेगळी वेबसाईट बनवण्यात आली आहे. जिथे या सगळ्या युद्धभूमींची माहिती आहे. त्या जागांबद्दलच्या गोष्टी आहेत. त्या ठिकाणांपर्यंत कसं पोहोचता येईल, याबद्दलची माहिती आहे. साधारणतः सर्वसामान्य माणसांना या युद्धभूमींच्या ठिकाणी जाण्याची परवानगी नाही. पण, या वेबसाईटवर अर्ज करून परवानगीने तिथे जाता येणार आहे.