Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 15:35 IST2026-04-10T15:26:15+5:302026-04-10T15:35:27+5:30
गोव्यातील गर्दी आणि गोंगाटापासून दूर, भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी निसर्गसौंदर्य, स्वच्छता आणि शांततेच्या बाबतीत गोव्यालाही टक्कर देतात.

समुद्रकिनारा आणि सुट्ट्या असं समीकरण जुळलं की, आपल्या डोळ्यासमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे 'गोवा'. पण गोव्यातील गर्दी आणि गोंगाटापासून दूर, भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी निसर्गसौंदर्य, स्वच्छता आणि शांततेच्या बाबतीत गोव्यालाही टक्कर देतात. जर तुम्ही या सुट्ट्यांमध्ये काहीतरी वेगळं आणि निवांत शोधत असाल, तर ही ५ ठिकाणे तुमच्यासाठी परफेक्ट आहेत.

वर्काला, केरळ: समुद्राशेजारील अथांग कडा
केरळमधील वर्काला हे ठिकाण पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय होत आहे. येथे अरबी समुद्राच्या किनाऱ्याला लागूनच असलेल्या उंच आणि भव्य नैसर्गिक कडा हे मुख्य आकर्षण आहे. कड्यावर असलेली छोटी कॅफे, योगा सेंटर्स आणि तिथून दिसणारा सूर्यास्त तुमचा थकवा पळवून लावेल.

अलिबाग, महाराष्ट्र: जवळ आणि स्वस्त
मुंबई आणि पुण्याच्या जवळ असल्याने अलिबाग हे क्विक गेटवेसाठी उत्तम आहे. अलिबागचा मुख्य किनारा, वरसोली आणि नागाव बीच हे वॉटर स्पोर्ट्ससाठी ओळखले जातात. ओहोटीच्या वेळी चालत जाता येणारा समुद्रातील 'कुलाबा किल्ला' हे येथील प्रमुख वैशिष्ट्य आहे. ऐतिहासिक वारसा आणि समुद्र यांचा आनंद येथे एकाच वेळी घेता येतो.

गोकर्ण, कर्नाटक: ट्रेकिंग आणि बीचचा थरार
ज्यांना समुद्रकिनाऱ्यासोबतच थोडं धाडस आणि ट्रेकिंग आवडतं, त्यांच्यासाठी गोकर्ण हे सर्वोत्तम ठिकाण आहे. येथील 'ओम बीच' प्रसिद्ध आहेच, पण 'हाफ मून' आणि 'पॅराडाइज' बीचवर पोहोचण्यासाठी तुम्हाला डोंगरातून पायपीट करावी लागते. हा अनुभव कोणत्याही पर्यटकासाठी थरारक ठरू शकतो.

पॉन्डिचेरी: फ्रेंच संस्कृतीचा थाट
भारतीय परंपरा आणि फ्रेंच वास्तुकलेचा मेळ पाहायचा असेल तर पॉन्डिचेरीला नक्की जा. येथील 'प्रोमेनेड बीच' संध्याकाळच्या फेरफटक्यासाठी प्रसिद्ध आहे, तर 'पॅराडाइज बीच' त्याच्या नावाप्रमाणेच सुंदर आहे. येथील रंगीबेरंगी फ्रेंच गल्ल्या आणि तिथलं शांत वातावरण तुमच्या ट्रिपला एक वेगळीच उंची देईल.

लक्षद्वीप: भारताचं 'मालदीव'
जर तुम्हाला मालदीवसारखं निळं पाणी आणि पांढरी शुभ्र वाळू अनुभवायची असेल, तर लक्षद्वीपला पर्याय नाही. येथील पाणी इतकं स्वच्छ आहे की, तुम्ही समुद्राच्या तळाशी असलेले प्रवाळ स्पष्ट पाहू शकता. स्कूबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगसाठी बंगाराम आणि अगत्ती ही बेटे म्हणजे पर्यटकासांठी स्वर्गच आहेत.

















