Travel : स्वर्गाचा अनुभव घ्यायचाय? अवघी २४ घरं अन् कमालीची शांतता; मसूरीपासून अवघ्या ७ किमीवर आहे 'हे' ठिकाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 15:54 IST2026-04-02T15:42:26+5:302026-04-02T15:54:56+5:30

मसूरीच्या गजबजाटापासून अवघ्या ७ किमी अंतरावर वसलेलं हे छोटंसं गाव पर्यटकांना एका वेगळ्याच जगात घेऊन जातं.

धावपळीचं आयुष्य, ऑफिसमधील कामाचा ताण आणि शहरातली तीच ती गर्दी... या सगळ्यापासून दूर कुठेतरी शांत ठिकाणी जावंसं वाटतंय? मग तुमच्यासाठी उत्तराखंडमधील 'लँडोर' हे एक उत्तम ठिकाण ठरू शकतं.

मसूरीच्या गजबजाटापासून अवघ्या ७ किमी अंतरावर वसलेलं हे छोटंसं गाव पर्यटकांना एका वेगळ्याच जगात घेऊन जातं. विशेष म्हणजे, या ठिकाणी केवळ २४ घरं आणि ४ दुकानं आहेत, ज्यामुळे इथली शांतता आजही अबाधित आहे.

लँडोर हे एक ऑफबीट हिल स्टेशन आहे. दिल्लीपासून २७७ किमी अंतरावर असलेलं हे ठिकाण हिवाळ्यात पर्यटकांना भुरळ घालतं. या शहराचा इतिहास १८२५ पासून सुरू होतो. ब्रिटीश काळात वसवलेल्या या गावात आजही जुन्या धाटणीचे चर्च आणि इमारती पाहायला मिळतात.

लँडोर हे कँटोन्मेंट क्षेत्र असल्याने येथील जंगलांना आजही कोणीही हात लावलेला नाही. त्यामुळे इथली हवा शुद्ध आणि वातावरण निसर्गरम्य आहे. लँडोरची सर्वात मोठी खासियत म्हणजे इथलं मर्यादित बांधकाम. येथे केवळ २४ घरं आहेत. मर्यादित लोकसंख्या आणि कमी वर्दळ यामुळे येथील नैसर्गिक सौंदर्य आजही टिकून आहे.

जर तुम्हाला गर्दीपासून दूर, कोणाच्याही अडथळ्याविना हिवाळ्यातील थंडी आणि धुक्याचा आनंद घ्यायचा असेल, तर लँडोरसारखा दुसरा पर्याय नाही. लँडोरमधील लाल टिब्बा हे सर्वात उंच ठिकाण, जिथून हिमालयाचे विहंगम दृश्य दिसते. हिवाळ्यात इथून दिसणारी 'विंटर लाईन' पर्यटकांचे आकर्षण असते.

यासोबतच लँडोरमधील जुन्या काळातील दुकानांसाठी प्रसिद्ध असलेला सिस्टर्स बाजार हा बाजार आजही ब्रिटीश काळाची आठवण करून देतो. येथील जुने चर्च आणि दगडी बांधकामाच्या इमारती हिवाळ्यातील धुक्यात अधिकच सुंदर दिसतात. जबर्खेत नेचर रिझर्व्ह हे निसर्गप्रेमींसाठी आणि ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी हे एक नंदनवन आहे. याशिवाय इथे असलेले 'लँडोर बेक हाऊस' देखील प्रचंड प्रसिद्ध आहे.

लँडोरला जाण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे मसूरी गाठणे. मसूरीपासून तुम्ही टॅक्सीने अवघ्या २०-३० मिनिटांत लंढौरला पोहोचू शकता. हिवाळ्यात बर्फाचा आनंद घेण्यासाठी आणि मनःशांतीसाठी या ठिकाणाला एकदा तरी नक्की भेट द्या.