Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील पाचपट! फिरतानाही दिसेल भारतीय संस्कृतीची झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 15:35 IST2025-12-08T15:31:16+5:302025-12-08T15:35:51+5:30
बजेटफ्रेंडली परदेशवारीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक असा सुंदर देश आहे, जो भारताच्या अगदी शेजारी आहे.

बजेटफ्रेंडली परदेशवारीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक असा सुंदर देश आहे, जो भारताच्या अगदी शेजारी आहे. हा देश म्हणजे श्रीलंका. नैसर्गिक सौंदर्य, हिरवळ आणि मनमोहक समुद्रकिनाऱ्यांसाठी हा देश जगभर प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे, कमी बजेटमध्ये आंतरराष्ट्रीय ट्रिप करायची असल्यास श्रीलंका हा एक उत्तम आणि पॉकेट फ्रेंडली पर्याय आहे. केवळ चार दिवसांच्या सुट्टीत तुम्ही येथील निसर्ग, संस्कृती आणि चवदार सी-फूडचा अनुभव घेऊ शकता.

श्रीलंका तसा छोटा देश असला तरी येथील प्रत्येक ठिकाण खास आहे. चार दिवसांच्या ट्रिपमध्ये बीच, डोंगर आणि ऐतिहासिक वारसा अनुभवण्यासाठी तुमच्या ट्रिपची सुरुवात राजधानी कोलंबो येथून करा. विमानतळावर उतरल्यानंतर थेट शहरातील प्रसिद्ध गंगारामाया मंदिर पाहायला जा. संध्याकाळ समुद्राच्या शांत किनाऱ्यावर घालवा आणि रात्री शहराच्या गजबजलेल्या पेताह मार्केटमध्ये खरेदीचा आनंद घ्या. रात्री कोलंबोमध्ये मुक्काम करा.

दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी कोलंबोमधून विश्वप्रसिद्ध कॅंडी शहरासाठी ट्रेनने प्रवास करा. हा ट्रेन प्रवास अत्यंत निसर्गरम्य आणि रोमांचक असतो. कॅंडीमध्ये पोहोचल्यानंतर येथील शांत कॅंडी लेक आणि बौद्ध धर्मियांचे पवित्र स्थान असलेले टूथ टेंपल पाहा. तिसऱ्या दिवशी सकाळ झाली की 'मिनी इंग्लंड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नुवारा एलिया कडे कूच करा. हे ठिकाण अद्भुत चहाच्या बागांसाठी जगभर ओळखले जाते. येथे ग्रेगोरी लेक आणि रम्बोडा वॉटरफॉल्स पाहायला विसरू नका. दिवसभर फिरून झाल्यावर रात्रीच्या मुक्कामासाठी परत कॅंडी किंवा कोलंबो गाठा.

चौथा दिवस हा दिवस समुद्रासाठी राखून ठेवा. सकाळी नेगोंबो किंवा बेंटोटा बीचवर जा. समुद्रकिनाऱ्यावर शांत वेळ घालवा, फेरफटका मारा आणि येथील स्थानिक आणि चविष्ट सी फूडचा आस्वाद घ्या. यानंतर संध्याकाळपर्यंत विमानतळाकडे प्रस्थान करू शकता. तुमच्याकडे थोडा अधिक वेळ असल्यास, श्रीलंकेतील सिगरिया रॉक किल्ला, रावण फॉल्स, मिनटेल, ऍडम पीक या विशेष पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या.

श्रीलंका खऱ्या अर्थाने 'बजेट फ्रेंडली' डेस्टिनेशन आहे. चार दिवसांच्या ट्रिपचा तुमचा एकूण खर्च ₹२५००० ते ₹४००००च्या दरम्यान येऊ शकतो. भारतातील प्रमुख शहरांमधून कोलंबोसाठी राऊंड ट्रिप तिकीट जवळपास ₹१२००० ते ₹१८००० पर्यंत येऊ शकते. स्वस्त दरासाठी लवकर बुकिंग करणे महत्त्वाचे आहे. तर, चांगल्या तीन-स्टार हॉटेलमध्ये एका रात्रीचा खर्च साधारण ₹२००० ते ₹३००० येतो. त्यानुसार, तीन रात्रीच्या मुक्कामासाठी तुम्हाला सुमारे ₹६००० ते ₹९००० खर्च येऊ शकतो.

स्थानिक रेस्टॉरंट्समध्ये खाण्या-पिण्याचा दररोजचा खर्च ₹५०० ते ₹१०००पर्यंत असू शकतो. चार दिवसांसाठी एकूण ₹४००० ते ₹५०००चा खर्च अपेक्षित आहे. श्रीलंकेत टुक-टुक, लोकल ट्रेन आणि टॅक्सी वापरण्यासाठी सुमारे ₹३००० ते ₹४००० खर्च येऊ शकतो. पर्यटन स्थळांची एंट्री तिकिटे आणि काही ॲक्टिव्हिटीज मिळून हा खर्च ₹५००० ते ₹७०००पर्यंत जाऊ शकतो.

या सर्व खर्चाचा हिशोब केल्यास, तुम्ही केवळ ₹२५००० ते ₹४००००मध्ये परदेशात चार दिवसांची शानदार ट्रिप पूर्ण करू शकता. श्रीलंकेच्या प्रवासासाठी ई-व्हिसा आवश्यक आहे. भारतीय नागरिक हे व्हिसा ऑनलाईन काढू शकतात. याचा खर्च साधारण ₹१५०० ते ₹२००० येतो. श्रीलंकेत भारतीय रुपया चालत नाही, पण भारतीय रुपयाचे श्रीलंकेच्या रुपयात कन्व्हर्ट करणे खूप सोपे आहे.

बजेटमध्ये प्रवास करायचा असल्यास लोकल ट्रेनचा वापर करा. ही स्वस्त आणि रोमांचक वाहतूक व्यवस्था आहे. जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये प्रवास करत असाल, तर हलके आणि सुती कपडे, टोपी आणि सनस्क्रीन सोबत ठेवायला विसरू नका.
















