Travel : राष्ट्रपती भवन आतून पाहण्याची सुवर्णसंधी! बुकिंग कसं करायचं? तिकीट किती? वाचा संपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 19:36 IST2026-02-03T19:19:37+5:302026-02-03T19:36:42+5:30

राष्ट्रपती भवनाचे दरवाजे आता सर्वसामान्यांसाठीही उघडले आहेत. योग्य नियोजन आणि ऑनलाइन बुकिंगच्या मदतीने तुम्ही या ऐतिहासिक इमारतीची भव्यता आतून अनुभवू शकता.

देशाची राजधानी दिल्लीत आल्यावर प्रत्येक पर्यटकाची इच्छा असते की, भारताच्या प्रथम नागरिकाचं निवासस्थान म्हणजेच 'राष्ट्रपती भवन' जवळून पाहावं. अनेकदा आपण गेटच्या बाहेरून फोटो काढून परततो, पण तुम्हाला माहीत आहे का? राष्ट्रपती भवनाचे दरवाजे आता सर्वसामान्यांसाठीही उघडले आहेत. योग्य नियोजन आणि ऑनलाइन बुकिंगच्या मदतीने तुम्ही या ऐतिहासिक इमारतीची भव्यता आतून अनुभवू शकता.

३३० एकरमध्ये पसरलेले राष्ट्रपती भवन हे केवळ एक निवासस्थान नसून भारताच्या लोकशाहीचे आणि वारशाचे प्रतीक आहे. 'H' आकारात बनलेल्या या भव्य इमारतीत एकूण ३४० खोल्या आहेत. एडविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी डिझाइन केलेली ही इमारत पाहणे, हा एक डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव असतो.

राष्ट्रपती भवनाच्या मुख्य इमारतीतील निवडक भाग पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत. यामध्ये तुम्ही ते हॉल पाहू शकता जिथे राष्ट्रपती आंतरराष्ट्रीय पाहुण्यांची भेट घेतात. तसेच, जिथे राष्ट्रीय पुरस्कार सोहळे पार पडतात तो दरबार हॉल, राष्ट्रपती भवनाचे संग्रहालय आणि आतापर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींची तैलचित्रे तुम्हाला पाहता येतील. ही संपूर्ण टूर गाईडसोबत एका ग्रुपमध्ये केली जाते.

राष्ट्रपती भवनाला भेट देण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करणे अनिवार्य आहे. यासाठी तुम्ही visit.rashtrapatibhavan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन बुकिंग करू शकता. यासाथी प्रति व्यक्ती केवळ ५० रुपये इतके नाममात्र शुल्क आकारले जाते.

मुख्य इमारत मंगळवार ते रविवार सकाळी ९.३० ते दुपारी ४.३० या वेळेत खुली असते. शेवटची एन्ट्री दुपारी ४ वाजता दिली जाते. एका ट्रिपचा कालावधी साधारण ४५ मिनिटांचा असतो.

राष्ट्रपती भवनात जाण्यासाठी 'सेंट्रल सेक्रेटेरिएट' (Central Secretariat) हे सर्वात जवळचे मेट्रो स्टेशन आहे. गेट नंबर ३८ मधून प्रवेश दिला जातो, जे मेट्रो स्टेशनपासून साधारण १ किमी अंतरावर आहे. पटेल चौक मेट्रो स्टेशनवरूनही तुम्ही टॅक्सी किंवा ऑटोने गेट नंबर ३८ पर्यंत पोहोचू शकता.

राष्ट्रपती भवनात जाताना सोबत अधिकृत सरकारी ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड इ.) ठेवणे अनिवार्य आहे. मोबाईल फोन, कॅमेरा, बॅग आणि कोणतेही इलेक्ट्रॉनिक सामान आत नेण्यास सक्त मनाई आहे.

हेही लक्षात ठेवा की, सर्किट १: शुक्रवार, शनिवार आणि रविवारी खुले असते. सर्किट २: सोमवार सोडून सर्व दिवस खुले असते. सर्किट ३: ऑगस्ट ते मार्च दरम्यान शुक्रवार, शनिवार आणि रविवारी खुले असते.