Travel : चला, प्रेमाच्या शहरात! आयफेल टॉवर अन् सीन नदीच्या काठावर फिरण्यासाठी असा करा परफेक्ट प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:49 IST2025-12-30T12:31:01+5:302025-12-30T12:49:52+5:30

आयुष्यात एकदा तरी 'आयफेल टॉवर' प्रत्यक्षात पाहावा आणि सीन नदीच्या काठावर फिरावं, असं स्वप्न प्रत्येक पर्यटकाचं असतं.

आयुष्यात एकदा तरी 'आयफेल टॉवर' प्रत्यक्षात पाहावा आणि सीन नदीच्या काठावर फिरावं, असं स्वप्न प्रत्येक पर्यटकाचं असतं. फ्रान्सची राजधानी असलेलं पॅरिस हे शहर जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. तुम्हीही मुंबईहून पॅरिस सहलीचे नियोजन करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठीच...

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पॅरिसला जाण्यासाठी थेट आणि कनेक्टिंग अशा दोन्ही प्रकारच्या फ्लाईट्स उपलब्ध आहेत. 'एअर फ्रान्स' आणि 'एअर इंडिया'च्या थेट विमानाने तुम्ही साधारण १० तासांत पॅरिस गाठू शकता. जर तुम्ही किमान ३ महिने आधी तिकीट बुक केले, तर ₹६०,००० ते ₹८०,००० च्या दरम्यान येण्या-जाण्याचं तिकीट मिळू शकतं.

फ्रान्समध्ये जाण्यासाठी भारतीयांना 'शेंगेन व्हिसा'ची आवश्यकता असते. हा व्हिसा मिळाल्यावर तुम्ही फ्रान्ससह युरोपातील इतर अनेक देशांतही फिरू शकता. या व्हिसाची फी प्रौढांसाठी साधारण €९० (अंदाजे ₹९,०००) आहे.

हा व्हिसा मिळवण्यासाठी वैध पासपोर्ट, ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट, इन्कम टॅक्स रिटर्न, विमानाचे कन्फर्म तिकीट आणि हॉटेल बुकिंगची कागदपत्रे लागतात. VFS Globalच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण केली जाते.

पॅरिसमध्ये 'युरो' हे चलन चालते. सध्या १ युरोची किंमत साधारण ₹१०० ते १०६ च्या आसपास आहे. प्रवासादरम्यान रोख रकमेपेक्षा 'फॉरेक्स कार्ड' वापरणे अधिक सुरक्षित आणि सोयीचे पडते.

पॅरिसमध्ये प्रत्येक कोपऱ्यावर इतिहास आणि आधुनिकतेचा संगम पाहायला मिळतो. रात्रीच्या वेळी लखलखणारा आयफेल टॉवर पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. जगातील सर्वात मोठे म्युझियम लूव्र म्युझियम पॅरिसमध्येच आहे, जिथे लिओनार्डो द विंचीचे 'मोनालिसा' पेंटिंग पाहायला मिळते. तर, सीन नदीत क्रूझ राईडचा आनंद घेत संपूर्ण शहराचे दर्शन घेता येते. खरेदीसाठी जगप्रसिद्ध असलेला शाँझ-एलिझे हा रस्ता फॅशन प्रेमींसाठी स्वर्ग आहे. मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीही 'डिस्नेलँड पॅरिस'हे एक खास आकर्षण आहे.

एका व्यक्तीच्या ६ ते ७ दिवसांच्या पॅरिस सहलीसाठी साधारणपणे १.५ ते २ लाख रुपये खर्च येऊ शकतो. विमान तिकीट : ₹७०,००० (सरासरी), व्हिसा: ₹१०,००० ते ₹१२,०००, राहणे आणि जेवण: ₹६०,००० ते ₹८०,००० (मध्यम दर्जाच्या हॉटेल्समध्ये), स्थानिक फिरणे: ₹१०,००० (मेट्रो आणि बसचा वापर केल्यास) इतका खर्च लागू शकतो.

पॅरिसमध्ये फिरण्यासाठी तिथली 'मेट्रो' अत्यंत कार्यक्षम आणि स्वस्त आहे. टॅक्सीऐवजी मेट्रोचा वापर केल्यास पैशांची मोठी बचत होते. पॅरिसला भेट देण्यासाठी एप्रिल ते जून किंवा सप्टेंबर ते ऑक्टोबर हा काळ हवामानानुसार उत्तम असतो. तिथे फ्रेंच बोलली जाते, मात्र पर्यटन स्थळांवर इंग्रजी समजणारे लोक सहज भेटतात.