Travel : स्वप्नातलं शहर की वास्तवातली जादू? पाण्यावर तरंगणाऱ्या वेनिस शहरात 'असा' करा स्वस्तात प्रवास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:58 IST2025-12-29T12:50:07+5:302025-12-29T12:58:57+5:30
इटलीतील वेनिस हे शहर म्हणजे जगातील पर्यटकांचे नंदनवन! पाण्यावर वसलेली ही सुंदर नगरी प्रत्येकाच्या स्वप्नातील ठिकाण आहे.

इटलीतील वेनिस हे शहर म्हणजे जगातील पर्यटकांचे नंदनवन! पाण्यावर वसलेली ही सुंदर नगरी प्रत्येकाच्या स्वप्नातील ठिकाण आहे. जर तुम्ही मुंबईहून वेनिसच्या सहलीचे नियोजन करत असाल, तर तिथे कसे जाल, किती खर्च याची ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल.

मुंबईहून वेनिसला जाण्यासाठी थेट विमान सेवा नाही, मात्र दुबई, दोहा किंवा इस्तंबूलमार्गे अनेक कनेक्टिंग फ्लाईट्स उपलब्ध आहेत. जर तुम्ही २-३ महिने आधी बुकिंग केले तर प्रति व्यक्ती ₹५०,००० ते ₹७०,००० दरम्यान तिकीट मिळू शकते. एमिरेट्स, कतार एअरवेज, लुफ्थांसा आणि इंडिगो हे लोकप्रिय पर्याय आहेत.

इटली हे 'शेंगेन' देशांमध्ये येते, त्यामुळे तुम्हाला शेंगेन व्हिसा काढावा लागेल. प्रौढांसाठी साधारण ९० युरो (सुमारे ₹८,५०० ते ₹९,५००) आहे. मुलांसाठी (६ ते १२ वर्षे) ही फी निम्मी असते. यासाठी तुम्हाला 'VFS Global'द्वारे अपॉइंटमेंट घेऊन कागदपत्रे जमा करावी लागतात. प्रक्रियेसाठी किमान १५-२० दिवस लागतात. या प्रक्रियेसाठी पासपोर्ट, परतीचे विमान तिकीट, हॉटेल बुकिंग, ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि मागील ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट या कागदपत्रांची गरज भासते.

इटलीमध्ये युरो हे चलन चालते. १ युरो म्हणजे भारतीय चलनात साधारण १०० ते १०६ रुपये आहे. परदेश प्रवासासाठी 'फॉरेक्स कार्ड' वापरणे सर्वात सोयीचे आणि स्वस्त पडते.

वेनिस हे कालव्यांचे शहर आहे. येथे पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. वेनिसमधील सर्वात मोठा जलमार्ग 'ग्रँड कॅनाल', सेंट मार्क्स स्क्वेअर (St. Mark's Square): शहरातील मुख्य चौक आणि सुंदर बॅसिलिका (चर्च), वेनिसमधील सर्वात जुना आणि प्रसिद्ध पूल 'रियाल्टो ब्रिज', गोंडोला राईड, काचेच्या वस्तू आणि रंगीबेरंगी घरांसाठी प्रसिद्ध मुरानो आणि बुरानो बेट ही ठिकाणे नक्की बघा.

वेनिस हे थोडे महागडे शहर मानले जाते. ५ दिवसांच्या सहलीसाठी अंदाजे राहण्याचा खर्च ₹५,००० ते ₹७,००० (प्रति रात्र), जेवण: ₹३,००० ते ₹५,००० (प्रति दिवस) तर, स्थानिक प्रवासासाठी 'वापोरेटो' (वॉटर बस) चे पास काढणे स्वस्त पडते. विमान तिकीट धरून एका व्यक्तीला ५-६ दिवसांसाठी साधारण ₹१.५ लाख ते ₹२ लाख खर्च येऊ शकतो.

एप्रिल ते जून किंवा सप्टेंबर ते ऑक्टोबर हा काळ वेनिस फिरण्यासाठी सर्वोत्तम आहे. वेनिसमध्ये गाड्या चालत नाहीत, त्यामुळे खूप चालावे लागते. आरामदायक शूज सोबत ठेवा. शॉपिंग करताना 'Tax-Free' फॉर्म मागायला विसरू नका, जेणेकरून विमानतळावर व्हॅट रिफंड मिळू शकेल.

















