प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 20:24 IST2025-12-13T19:59:34+5:302025-12-13T20:24:44+5:30

Indian Railway Tatkal Ticket Booking New Rules: राजधानी, वंदे भारत, दुरांतो या ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट आहे.

Indian Railway Tatkal Ticket Booking New Rules: भारतीय रेल्वेने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्या लाखोंच्या घरात आहे. अनेकदा तिकीट बुकिंग करताना प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते. तत्काळ तिकीट बुकिंग करतानाचा तर अनुभव अतिशय वाईट असल्याचे प्रवासी वारंवार सांगतात. कितीही आटोकाट प्रयत्न केले तरी तत्काळ तिकीट मिळत नाही, अशी तक्रार बहुतांश प्रवासी करत असतात.

रेल्वेची तिकीट बुकिंग प्रणाली अधिक पारदर्शी आणि प्रवासी सुलभ व्हावी, यासाठी भारतीय रेल्वेकडून अनेकदा सर्व रेल्वे मंडळांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातात. तत्काळ तिकिटाच्या संदर्भातही रेल्वेने अनेक बदल केले आहेत. प्रवाशांना तत्काळ तिकीट प्रणालीचा चांगल्या पद्धतीने लाभ घेता यावा, यासाठी रेल्वे मंत्रालय प्रयत्नशील असल्याचे म्हटले जाते.

प्रवाशांच्या सोयी, सुविधा वाढाव्यात, प्रवाशांना सुलभ प्रक्रियेतून तिकीट तसेच अन्य सेवा मिळाव्यात, भारतीय रेल्वेकडून दिल्या जाणाऱ्या सोयी, सुविधा, सेवा या अधिक पारदर्शी असाव्यात, यासाठी भारतीय रेल्वे नियमात, प्रक्रियेत बदल करत असते. रेल्वेच्या तिकिटांबाबत अलीकडे प्रवाशांच्या तक्रारी सातत्याने वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे.

यातच आता रेल्वेने ‘तत्काळ’ सेवेतून तिकीट काढताना, मध्यस्थ आणि दलालांमार्फत होणारी घुसखोरी रोखण्यासाठी ज्या व्यक्तीला तत्काळ तिकीट हवे आहे, त्या व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावरील OTP देणे अनिवार्य केले आहे. या निर्णयाची प्रायोगिक चाचणी मध्य रेल्वेच्या स्थानकांवरून घेण्यास सुरुवात झाली आहे.

देशभरात कोठेही रेल्वे प्रवास करण्यासाठी आरक्षण तिकीट काढावे लागते. आरक्षण क्षमता पूर्ण झाली असली, तरी ज्या प्रवाशांना तातडीने प्रवास करावयाचा आहे, अशा प्रवाशांसाठी रेल्वे मार्गस्थ होण्याच्या एक दिवस अगोदर ‘तत्काळ’ सुविधेचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

मात्र, गेल्या काही वर्षांपासून खासगी तिकीट उपलब्ध करून देणारे संकेतस्थळ, ऑनलाईन ॲप, दुवे आणि दलाल यांच्याकडून ‘तत्काळ’ सेवा खुली होताच आगाऊ आरक्षण केले जाते. त्यानंतर बाजारभावानुसार या तिकीटांची विक्री करून प्रवाशांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार दररोज घडत आहेत.

भारतीय रेल्वेने आता ‘तत्काळ’ सुविधेचा लाभ योग्य व्यक्तीला मिळावा यासाठी मोबाईल क्रमांकावर ‘ओटीपी’ अनिवार्य केला आहे. याचा लाभ घेण्यासाठी प्रवाशाने ‘आयआरसीटीसी’ संकेतस्थळ, रेल्वे मोबाईल ॲप, किंवा तिकीट खिडकीतून किंवा अधिकृत मध्यस्थामार्फत नोंदणी करताना वैयक्तिक मोबाईल नंबर देणे बंधनकारक केले आहे.

त्यामुळे त्याच व्यक्तीला या सेवेला लाभ घेता येणार आहे. याची प्राथमिक सुरुवात मध्य रेल्वे विभागातील स्थानकांवरून चालवल्या जाणाऱ्या १५ ट्रेनपासून केली जात आहे. लांब पल्ल्याच्या आणि उच्च-गती श्रेणीतील ट्रेनना मागणी खूप जास्त असते. या ट्रेनची तत्काळ तिकिटे मोठ्या प्रमाणात अगोरदच आरक्षित करून बाजारात जादा दराने विक्री करून प्रवाशांची अडवणूक केली जात असल्याचे प्रकारही समोर आले आहेत.

त्या पार्श्वभूमीवर १५ ट्रेनची निवड करण्यात आली आहे. रेल्वेने प्रवासाचे आरक्षण करण्यासाठी प्रवाशांनी स्वत:चाच मोबाईल देणे अपेक्षित आहे. तत्काळ सेवेचा लाभ घेताना प्रवाशांनी अचूक आणि काळजीपूर्वक मोबाईल क्रमांक भरावा. अन्यथा ओटीपी प्राप्त होणार नाही. दलाल आणि मध्यस्थांकडून फसवणूक टाळण्यासाठी आणि योग्य व्यक्तीला लाभ मिळण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

लोकमान्य टिळक टर्मिनस – सिकंदराबाद दुरांतो एक्सप्रेस, पुणे – हावडा दुरांतो एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस– एर्नाकुलम जंक्शन दुरांतो एक्सप्रेस, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस– हावडा दुरांतो एक्सप्रेस, पुणे – हजरत निजामुद्दीन जंक्शन दुरांतो एक्सप्रेस, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर दुरांतो एक्सप्रेस, नागपूर – छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस दुरांतो एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस – प्रयागराज दुरांतो एक्सप्रेस, पुणे – अहमदाबाद जंक्शन दुरांतो एक्सप्रेस या ट्रेनचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

नागपूर – सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस, पुणे – हुबळी जंक्शन वंदे भारत एक्सप्रेस, छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर – पुणे वंदे भारत एक्सप्रेस, पुणे – छत्रपती शाहू महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस, पुणे – हैदराबाद शताब्दी एक्सप्रेस, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – हजरत निजामुद्दीन जंक्शन राजधानी एक्सप्रेस या ट्रेनचाही समावेश या यादीत आहे.

मध्य रेल्वेवरील सदर ट्रेनमध्ये तत्काळ तिकिट बुकिंगसाठी नवीन OTP आधारित प्रमाणीकरण प्रणाली लागू करण्यात आली आहे. ही नवीन प्रणाली संगणकीकृत पीआरएस काउंटर, अधिकृत एजंट आणि आयआरसीटीसी वेबसाइट/अ‍ॅपद्वारे बुक केलेल्या तत्काळ तिकिटांसाठी लागू असेल. या प्रक्रियेअंतर्गत, प्रवाशांना बुकिंगच्या वेळी दिलेल्या मोबाइल नंबरवर एक वेळ वापरायचा पासवर्ड (OTP) मिळेल. यशस्वी ओटीपी पडताळणीनंतरच तत्काळ तिकिट जारी केले जाईल.

या उपाययोजनेचा उद्देश पारदर्शकता आणखी वाढवणे, गैरवापर रोखणे आणि तात्काळ कोट्यातील बुकिंगचा लाभ योग्य प्रवाशांना मिळावा याची खात्री करणे हा आहे. मध्य रेल्वे प्रवाशांना विनंती करीत आहे की, गैरसोय टाळण्यासाठी तात्काळ तिकीट बुकिंग करताना आपला मोबाईल क्रमांक अचूक नमूद करावा, अशी सूचना करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेप्रमाणे पश्चिम रेल्वेवरही तत्काळ तिकीट बुकिंग करताना OTP आधारित प्रमाणीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रेल्वेने ०१ जुलैपासून तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार वेरिफिकेशन आवश्यक केले होते. आता रेल्वेचे तिकीट आरक्षित करण्यासाठी आधार वेरिफिकेशन आवश्यक केले. रेल्वेचा हा निर्णय तिकीट बुकिंग सुरु झाल्यानंतर सामान्य प्रवाशांना तिकीट बुक करता यावे यासाठी करण्यात आला.

दरम्यान, १ ऑक्टोबर २०२५ पासून आरक्षण सुरू झाल्यानंतर ज्या लोकांची आधार कार्ड पडताळणी झाले आहे, तेच पहिल्या १५ मिनिटांसाठी ऑनलाइन तिकीट बुक करू शकतील. हा नियम आयआरसीटीसी वेबसाइट आणि मोबाईल अॅप दोन्हीवर लागू झाला आहे.