तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 20:07 IST2025-11-12T20:03:29+5:302025-11-12T20:07:57+5:30

मित्रांसोबत नवीन मोबाईल फोन, बूट किंवा ट्रॅव्हल पॅकेजची चर्चा करता आणि काही वेळातच त्याच गोष्टीची जाहिरात तुमच्या फोनवर दिसू लागते. हा निव्वळ योगायोग आहे की फोन आपले बोलणे ऐकत आहे?

तुम्हालाही वाटते का की तुमचा फोन तुमची खाजगी चर्चा ऐकत आहे? आपली प्रायव्हसी धोक्यात आहे का?चला, यामागील सत्य आणि विज्ञान काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया.

जेव्हा आपण फोन वापरतो, तेव्हा सोशल मीडिया, ब्राउझर आणि सर्च इंजिनसारखे ॲप्स आपला प्रत्येक व्यवहार, आपण काय पाहतो, काय सर्च करतो आणि कशावर जास्त वेळ घालवतो... हे सर्व रेकॉर्ड करतात. तुमच्या आवडी-निवडीचा हा डेटा कंपन्यांपर्यंत पोहोचतो.

Google आणि Meta (Facebook) सारख्या मोठ्या कंपन्या याच डेटाचा अभ्यास करतात. या विश्लेषणातून त्यांना कळते की तुम्हाला कशात रस आहे. यामुळेच, तुम्ही सर्च केलेल्या किंवा अलीकडे पाहिलेल्या गोष्टींच्या जाहिराती तुम्हाला वारंवार दाखवल्या जातात.

अनेक ॲप्स इन्स्टॉल करताना 'मायक्रोफोन ॲक्सेस'ची परवानगी मागतात. तुम्ही एकदा 'Allow' बटण दाबले की, काही ॲप्स पार्श्वभूमीवर विशिष्ट 'कीवर्ड्स' ओळखण्यासाठी ॲक्टिव्ह राहू शकतात. त्यामुळे, आपल्याला अनेकदा फोन ऐकत असल्याचा भास होतो.

Google Assistant किंवा Siri सारखे व्हॉइस असिस्टंट ट्रिगर शब्द उच्चारल्याशिवाय ॲक्टिव्ह होत नाहीत. पण जेव्हा ते ऑन होतात, तेव्हा तुमचे बोलणे रेकॉर्ड होऊन सर्व्हरवर जाते. अनेकदा हा डेटा तुमच्या आवडी-निवडी समजून घेण्यासाठीही वापरला जातो.

वास्तविक, फोन तुमच्या ऑनलाइन सर्चचा मागोवा घेतो. तुम्ही काय सर्च केले, कोणत्या साइटवर गेलात, कोणते व्हिडीओ पाहिले, या सर्व माहितीमुळेच ॲड अल्गोरिदमला कळते की तुम्हाला पुढे काय दाखवायचे आहे.

तुमचा डेटा सुरक्षित ठेवायचा असेल तर फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन मायक्रोफोन ॲक्सेस अनावश्यक ॲप्सकडून काढून टाका. google/Facebook च्या प्रायव्हसी सेटिंग्समध्ये बदल करा. रज नसल्यास व्हॉइस असिस्टंट बंद करा.