SIM Card चा एक कोपरा कापलेला का असतो? डिझाइन नाही, तर त्यामागे आहे मोठे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 16:14 IST2026-01-27T16:07:31+5:302026-01-27T16:14:05+5:30

SIM Card: तुम्ही कधी सिम कार्ड निरखून पाहिले का? प्रत्येक सिम कार्डच्या एका कोपऱ्यात कट असतो...

SIM Card: तुम्ही कधी तुमच्या फोनमधील 'सिम कार्ड'ला नीट पाहिले आहे का? प्रत्येक सिम कार्डचा एक कोपरा कट केलेला असतो. विशेष म्हणजे, भारतातले सिम कार्ड असो किंवा परदेशातले, हा कट आणि सिमचा आकार जवळपास सारखाच असतो. पहिल्या नजरेला हा केवळ डिझाइनचा भाग वाटेल, पण प्रत्यक्षात या कटामागे तांत्रिक कारण दडलेले आहे. हे तुमचा फोन खराब होण्यापासून वाचवते.

सिम कार्डची कथा 1990 च्या दशकाच्या सुरुवातीपासून सुरू होते. सुरुवातीच्या काळात सिम कार्ड आजच्या क्रेडिट कार्डइतके मोठे होते. मोबाइल फोन लहान होत गेला, तसा सिम कार्डचा आकारही बदलत गेला. आधी मिनी सिम, त्यानंतर मायक्रो सिम आणि अखेरीस नॅनो सिम प्रचलित झाले. मात्र, आकार बदलला तरी सिमच्या कोपऱ्यातील कट कायम राहिला.

युरोपियन दूरसंचार मानक संस्था ETSI ने सिम कार्डच्या या कट केलेल्या कोपऱ्याला जागतिक मानक म्हणून स्वीकारले. उद्देश एकच, जगभरात सिम कार्ड एकसारख्या पद्धतीने आणि सुरक्षितरीत्या वापरता यावे.

या डिझाइनचा मुख्य फायदा म्हणजे सिम चुकीच्या दिशेने घालण्याची शक्यता जवळपास नाहीशी होते. सिम कार्डच्या मध्यभागी असलेली सोनसळी चिप फोनच्या सिम स्लॉटमध्ये अचूक बसणे आवश्यक असते. सिम उलटे घातल्यास खराब होऊ शकते किंवा फोनमधील नाजूक सिम रीडरलाही नुकसान होऊ शकते. कटलेला कोपरा हा एक प्रकारचा गाईड म्हणून काम करतो, ज्यामुळे सिम ट्रेमध्ये सिम योग्य दिशेने बसवणे सोपे होते.

हे डिझाइन फक्त वापरकर्त्यांसाठीच नाही, तर मोबाइल उत्पादक कंपन्यांसाठीही उपयुक्त आहे. फोनची सिम ट्रे आणि आतील स्लॉट याच कटेलेल्या डिझाइननुसार तयार केले जातात. त्यामुळे फोन असेंबल करताना चूक होण्याची शक्यता कमी होते. म्हणूनच जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातला युजर सिम चुकीच्या पद्धतीने बसवू शकत नाही.

मात्र, आता हळूहळू स्मार्टफोन्समध्ये e-SIM चा वापर वाढत आहे. काही कंपन्यांनी तर असे फोनही लाँच केले आहेत, ज्यामध्ये फिजिकल सिम स्लॉटच नसतो. या फोनमध्ये टेलिकॉम ऑपरेटर डिजिटल पद्धतीने सिम अ‍ॅक्टिव्हेट करतात. भविष्यात e-SIM चा वापर अधिक वाढल्यास, कटलेले सिम कार्ड इतिहासाजमा होऊ शकते.