WhatsApp वरून पाठवता येणार 2GB पर्यांतची मोठी फाईल; ग्रुपमधील मेम्बर्सची संख्या देखील वाढली

By सिद्धेश जाधव | Published: May 6, 2022 11:50 AM2022-05-06T11:50:07+5:302022-05-06T11:55:19+5:30

WhatsApp वर अनेक नवीन फीचर्स रोल आउट करण्यात आले आहेत. आता लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपचा वापर करून 2GB पर्यंतची फाईल सहज पाठवता येईल.

WhatsApp सतत नवीन फिचर सादर करून मेसेजिंगचा अनुभव सुधारण्याचा प्रयत्न करत असतं. गेल्या महिन्यात कंपनीनं एका ब्लॉग पोस्टमधून काही आगामी फीचर्सची घोषणा केली होती. हे फीचर्स आता हळूहळू अ‍ॅपमध्ये दिसू लागेल आहेत.

5 मेला मेटाचे सीईओ मार्क जुकरबर्गनं फेसबुक हँडलवरून WhatsApp Reactions फीचर रोल आउट करण्याची घोषणा केली होती. तसेच कंपनीच्या अधिकृत ब्लॉगच्या माध्यमातून कम्युनिटी आणि 2GB फाईल ट्रांसफर फीचर देखील येणार असल्याचं सांगितलं आहे. पुढे आम्ही या फीचर्सची यादी दिली आहे.

WhatsApp नं फाईल ट्रान्सफरची मर्यादा वाढवली आहे. आधी 100MB पर्यांतची फाईल ट्रान्सफर करता येत होती. पंरतु नवीन अपडेट रोल आउट झाल्यानंतर 2GB पर्यंतची फाईल पाठवता येईल. थोडक्यात आता एक चांगल्या क्वॉलिटीचा चित्रपट देखील तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टसना पाठवता येईल. फक्त व्हिडीओज नव्हे तर 2GB चे फोटोज आणि डॉक्युमेंट देखील पाठवता येतील.

ग्रुप ऑफ ग्रुप्स म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप कम्युनिटीज, असं कंपनीनं म्हटलं आहे. या फिचरच्या माध्यमातून अनेक छोटे ग्रुप्स एकत्र करता येतील. यामुळे तुमचे शाळा, लोकल क्लब, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्सना असे ग्रुप्स तुम्ही एकाच छत्राखाली आणू शकता. या सर्वांना एकच मेसेज सहज ब्रॉडकास्ट करू शकाल.

हे फिचर याआधी Instagram, Facebook आणि Messenger मध्ये तुम्ही पाहिलं असेल. यात तुम्ही आलेल्या मेसेजला लॉन्ग प्रेस करून एक इमोजी रिअ‍ॅक्शन देऊ शकता. फीचरच्या माध्यमातून युजर्सना त्यांचे इमोशन्स (Emotions) शेयर करता येतील. तसेच एखाद्या ग्रुपचा कल देखील मेसेजवरील रिअ‍ॅक्शनवरून समजेल.

आता युजर व्हिडीओ किंवा ऑडियो कॉल मध्ये 8 च्या ऐवजी जास्तीत जास्त 32 लोकांना अ‍ॅड करू शकतील. हे फीचर गेल्याच महिन्यात युजर्सच्या भेटीला आलं आहे.

WABetainfo च्या रिपोर्टनुसार लवकरच व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये 512 यूजर्स जोडण्याचा पर्याय मिळेल. सध्या 256 सदस्य जोडण्याची मर्यादा आहे. नवीन फिचर सध्या iOS प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झालं आहे आणि लवकरच अँड्रॉइड बीटा व्हर्जनवर देखील हे फिचर दिसेल.