तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 10:44 IST2026-01-01T10:35:00+5:302026-01-01T10:44:44+5:30

Old Days Technology: दूरसंचार विभागाने शेअर केलेल्या आठवणींनी इंटरनेटवर जुन्या तंत्रज्ञानाचा काळ पुन्हा जिवंत झाला आहे.

आजच्या ५जी आणि हाय-स्पीड फायबर इंटरनेटच्या युगात आपण सेकंदाला जगाशी जोडले जातो. पण, १०-१५ वर्षांपूर्वीचा काळ आठवला की आजही डोळ्यासमोर पिवळ्या रंगाचे PCO बूथ आणि नोकियाचे ते अजरामर मोठाले फोन उभे राहतात.

दूरसंचार विभागाने (DoT) नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ९० च्या दशकातील तंत्रज्ञानाचा रंजक प्रवास मांडला असून, इंटरनेटवर जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे.

स्मार्टफोनच्या आधी 'फिचर फोन'चा जमाना होता. त्यातही नोकियाच्या ११०० किंवा ३३१० सारख्या मॉडेल्सनी भारतीय बाजारपेठ गाजवली होती. या फोनचा की-पॅड आणि त्यातील तो प्रसिद्ध 'स्नेक' (Snake) गेम आजही अनेक तरुणांच्या बालपणीचा अविभाज्य भाग आहे. 'चार्जिंग टिकते म्हणजे काय' याचा खरा अनुभव याच फोननी दिला.

एकेकाळी प्रत्येक गल्लीच्या कोपऱ्यावर दिसणारे 'STD-ISD' चे बोर्ड आज गायब झाले आहेत. एक रुपयाचे नाणे टाकून चालणारा तो पिवळा डबा आणि कागदावर येणारी ती छोटी पावती, हा त्या काळातील संवादाचा मुख्य आधार होता. घराबाहेर पडल्यावर कुटुंबाशी संपर्क साधण्याचे ते एकमेव साधन होते.

ब्रॉडबँड येण्यापूर्वी इंटरनेटचा खरा अनुभव या छोट्या 'डोंगल'ने दिला. लॅपटॉपला पेनड्राइव्हसारखे डोंगल लावून इंटरनेट सर्फिंग करणे ही तेव्हा मोठी गोष्ट मानली जात असे. ३जी इंटरनेटचा तो वेग आणि निळ्या रंगाचा डोंगल इंटरनेट युगाची पहिली पायरी ठरला.

आपण मोबाईलवर एका क्लिकवर रिचार्ज करतो, पण तेव्हा दुकानात जाऊन १० किंवा २० रुपयांचे रिचार्ज कार्ड विकत घ्यावे लागायचे. ते कार्ड कॉईनने घासून त्यातील १६ अंकी गुप्त क्रमांक डायल करून बॅलन्स मिळवण्याचा आनंद काही वेगळाच होता.

तंत्रज्ञान जसे प्रगत होत गेले, तशी जुनी साधने संग्रहालयात जमा झाली. आज इंटरनेट स्वस्त झाले आहे आणि फोन स्मार्ट. पण PCO वर रांगेत उभे राहणे किंवा इंटरनेट जोडण्यासाठी डोंगलचा सिग्नल शोधणे, यात जी ओढ होती ती आजच्या 'इन्स्टंट' युगात हरवली असल्याची भावना नेटकरी व्यक्त करत आहेत.