उन्हाळा सुरु होतोय...! पहिल्यांदा AC सुरू करण्यापूर्वी 'ही' ५ कामे नक्की करा; अन्यथा खिशाला पडेल मोठी कात्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 14:03 IST2026-02-17T14:00:14+5:302026-02-17T14:03:55+5:30

AC Maintenance Tips : उन्हाळा सुरु होतोय म्हणून बऱ्याच महिन्यांनी पहिल्यांदा एसी सुरू करत आहात? मग हे ५ उपाय नक्की करा. सर्व्हिसिंग, फिल्टर क्लीनिंग आणि कॉम्प्रेसरची काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स मराठीत.

फेब्रुवारी महिना संपत आला असून उन्हाचा चटका वाढू लागला आहे. लवकरच घराघरात एअर कंडिश्नर सुरू होतील. मात्र, अनेक महिने बंद असलेला एसी थेट सुरू करणे धोकादायक ठरू शकते.

यामुळे एसी खराब होण्यासोबतच विजेचे बिलही वाढू शकते. यंदाचा उन्हाळा सुसह्य करण्यासाठी आणि मोठा खर्च टाळण्यासाठी एसी सुरू करण्यापूर्वी खालील ५ महत्त्वाच्या टिप्स फॉलो करा.

अनेक महिने बंद असल्यामुळे एसीच्या फिल्टरमध्ये आणि कॉइल्समध्ये धूळ साचलेली असते. त्यामुळे तो सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञ तंत्रज्ञांकडून 'हार्ड सर्व्हिस' करून घ्यावी. जर सर्व्हिसिंगला वेळ असेल, तर किमान फिल्टर काढून ते पाण्याने स्वच्छ धुवावेत.

स्प्लिट एसी असल्यास बाहेर बसवलेले आऊटडोअर युनिट तपासा. त्यातील कंडेंसर जाळी धूळ किंवा कचऱ्यामुळे ब्लॉक झाली असल्यास पाण्याचा जोरदार फवारा मारून ती स्वच्छ करा. आऊटडोअर युनिटसमोर किमान २-३ फूट मोकळी जागा असावी याची खात्री करा.

एसी बंद असताना अनेकदा ड्रेन पाईपमध्ये कचरा साचतो, ज्यामुळे एसीमधून पाणी गळू शकते. एसी सुरू करण्यापूर्वी पाईपमधून पाण्याचा निचरा व्यवस्थित होतोय की नाही हे तपासा.

एसीला मिळणारा वीजपुरवठा स्थिर असावा यासाठी स्टेबलायझर व्यवस्थित काम करत असल्याची खात्री करा. लूज कनेक्शन किंवा जळालेली वायर असेल तर ती वेळीच दुरुस्त करा, ज्यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका टळेल.

एसी थेट कुलिंग मोडवर सुरू करण्याऐवजी पहिल्यांदा १०-१५ मिनिटे 'फॅन मोड'वर चालवा. यामुळे एसीमधील साचलेली धूळ बाहेर येईल आणि कॉम्प्रेसरवर अचानक ताण पडणार नाही.