YouTube आता 'या' नव्या फिचरद्वारे TikTok ला टक्कर देण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 07:01 PM2020-06-26T19:01:27+5:302020-06-26T20:22:27+5:30

टिकटॉक (TikTok) या भारतातील लोकप्रिय सोशल मीडीयावरील अ‍ॅपसमोर आता देशामध्ये व्यवसायाची पुढील वाट बिकट झाली आहे. बाईट डान्स या चीनच्या कंपनीच्या मालकीचे असलेले हे टिकटॉक अ‍ॅप मागील अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये आहे.

सध्या भारत-चीन वाद आणि त्यावरून सामान्यांनी चिनी वस्तूंवर, अ‍ॅपवर बंदी घालण्याची घेतलेली भूमिका यामुळे टिकटॉकला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

यातच सोशल मीडियावर टिकटॉक अॅपची लोकप्रियता पाहता अशा प्रकारचे अ‍ॅप्स इतर मोठ्या कंपन्यादेखील आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्मवरुन फेसबुक आणि इंस्टाग्राम हे दोघेही टिकटॉकसोबत स्पर्धा करण्याचा सतत प्रयत्न करीत आहेत.

दरम्यान, आता या शर्यतीत यूट्यूबही (YouTube) आले आहे. YouTube एका नवीन फीचरची टेस्ट करत आहे. ज्याद्वारे युजर्स 15 सेकंदाचे व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात.

YouTubeने म्हटले आहे की, मल्टी सेगमेंट व्हिडिओ फिचरद्वारे काही युजर्सना शॉर्ट व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा पर्याय दिला जात आहे.

YouTubeच्या या मल्टी सेगमेंट व्हिडिओ टेस्टिंगद्वारे मर्यादित युजर्ससाठी Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर जारी केले जात आहे. क्रिएटर्स या फीचरनुसार थेट मोबाइल अॅपवरून मल्टिपल क्लिप रेकॉर्ड करू शकतात.

YouTubeने म्हटले आहे की, कंपनी क्रिएटर्ससाठी नवीन आणि सोपी पद्धत टेस्ट करत आहे. त्यामुळे ते मल्टिपल क्लिप्स सहज रेकॉर्ड करून थेट एक व्हिडिओ म्हणून अपलोड करू शकतील. हे मोबाइल अ‍ॅपमधूनच होणार आहे.

लहान व्हिडिओसाठी मोबाइल अपलोड फ्लोमध्ये create a vieo वर टॅप करावे लागणार आहे. येथे टॅप आणि होल्ड बटण रेकॉर्डिंगला सुरुवात करेल आणि पहिली क्लिप रेकॉर्ड केली जाईल.

यानंतर हे बटण सोडावे लागेल आणि रेकॉर्डिंग थांबवावे लागेल. अशा प्रकारे रिपीट करून, सतत 15-15 सेकंदांचे व्हिडिओ तयार करू शकता.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, जर युजर्संना मोठे व्हिडिओ अपलोड करायचे असतील तर त्यांना थेट गॅलरीमधून अपलोड करावे लागेल.

सध्या युजर्स इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर शॉर्ट व्हिडिओसाठी जात असल्याने, यूट्यूबलाही या युजर्संना आपल्या व्यासपीठावर आणण्याची इच्छा आहे.