चिनी अ‍ॅप TikTok आता होणार मायक्रोसॉफ्टच्या मालकीचे? खरेदीसाठी तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 03:10 PM2020-08-03T15:10:31+5:302020-08-03T15:44:07+5:30

चिनी अॅप टिकटॉक (TikTok) भारतात बंदी घातली आहे. आता अमेरिकेतही या अॅपवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. या अॅपवर बंदी घातली जाईल असे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे.

यातच आता मायक्रोसॉफ्ट कंपनी हे अॅप खरेदी करण्याच्या मार्गावर आहे. यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्य नडेला यांच्याशी चर्चा केल्याचे कंपनीने एक निवेदन जारी केले आहे.

या निवेदनात मायक्रोसॉफ्टने असेही म्हटले आहे की, ही कंपनी मायनॉरिटी बेसिसवर अमेरिकन गुंतवणूकदारांना यात सहभागी होण्यासाठी निमंत्रण देऊ शकते. यापूर्वीही अमेरिकेत टिकटॉक विकले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

'मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नाडेला आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेत टिकटॉक खरेदी करण्यासंदर्भात चर्चा करण्यास तयार आहे', असे मायक्रोसॉफ्टने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कंपनी अमेरिकेच्या फायद्यासाठी टिकटॉक खरेदी करण्याच्या विचारात आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या अ‍ॅपच्या सुरक्षिततेविषयी चिंता आहे. त्यामुळे अमेरिकन हितसंबंधासाठी अमेरिकेत कंपनी टिकटॉक खरेदी करु शकते, असेही मायक्रोसॉफ्टच्या या निवेदनात म्हटले आहे.

मायक्रोसॉफ्टने असेही स्पष्टीकरण दिले आहे की, टिकटॉकची मूळ कंपनी बाईटडन्सशी खरेदीसंदर्भात चर्चा 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल.

जर मायक्रोसॉफ्टने टिकटॉक विकत घेतला तर टिकटॉक पूर्णपणे मायक्रोसॉफ्टचा होईल, असे होणार नाही. फक्त अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये वापरण्यात येणारे टिकटॉक अ‍ॅप मायक्रोसॉफ्टच्या मालकीचे होईल.

सद्यस्थितीत कोरोनामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध बिघडले आहेत. त्यामुळे अमेरिकेत केव्हाही या अॅपवर बंदी घातली जाऊ शकते.

अमेरिकेत टिकटॉक अॅप लोकप्रिय झाले आहे, अशा परिस्थितीत हा अ‍ॅप खरेदी करून मायक्रोसॉफ्ट किमान डेटा सुरक्षित ठेवण्याविषयी चर्चा करू शकते.