‘फेसबुक’ने का बदलले नाव? तुमच्या अकाऊंटचे काय होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 09:53 IST2021-10-30T09:46:20+5:302021-10-30T09:53:10+5:30
Meta : मेटाव्हर्स हा व्हर्च्युअर रिॲलिटीची पुढची पायरी आहे. ही एक प्रकारची आभासी दुनिया आहे.

‘फेसबुक’ने आपले नाव बदलून ‘मेटा’ केले आहे. या बदलानंतर आता अनेक युजर्सच्या अकाऊंटचे काय होणार? नवे अकाऊंट तयार करावे लागेल का? फेसबुकच्या इतर ॲपवरील अकाऊंटचे काय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. जाणून घेऊया नेमकं काय होणार...
मेटाव्हर्स हेच नाव कशामुळे?
मेटाव्हर्स हा व्हर्च्युअर रिॲलिटीची पुढची पायरी आहे. ही एक प्रकारची आभासी दुनिया आहे. तिथे युजरला आपली व्हर्च्युअल ओळख असेल आणि अनेक गोष्टी आभासी जगात जगण्यासाठी तयार केल्या जातील. त्यामुळे हे नाव कंपनीने निवडले आहे.
बदनामी टाळण्यासाठी...?
गेल्या काही आठवड्यांमध्ये फेसबुकवर अनेक आरोप लागले आहेत. त्यातून कंपनीचे नाव खराब झाले आहे. नवे नाव आणून फेसबुक जुने नाव लोकांच्या मनातून पुसू इच्छित असल्याचेही म्हटले जाते.
सगळे अकाऊंट पुन्हा सुरू करावे लागतील का?
नाही. सध्यातरी युजर्सच्या अकाऊंटमध्ये कोणताही बदल होणार नाही. फेसबुक, व्हॉट्सॲप किंवा इन्स्टाग्रामवरील अकाऊंट जशास तसे कायम राहतील. मात्र, येत्या काळात हे तिन्ही अकाऊंट एकाच आयडीवरून चालू शकतील, असे तज्ञांचे म्हणणे आहे. एकाच ॲपवर सगळे अकाऊंटही मिळू शकतील, असेही मानले जात आहे.
नाव बदलल्याने काय होणार?
फेसबुक ही व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामसह अनेक कंपन्यांची पॅरेंट कंपनी आहे. या सर्व कंपन्यांना एकत्र आणण्यासाठी मार्क झुकेरबर्ग यांनी मेटाव्हर्स ही मोठी कंपनी तयार केली आहे. त्यात आता एकूण ९३ कंपन्यांचा समावेश असेल.