'असा' करा पेनड्राइव्ह सुरक्षित; कोणत्याही सॉफ्टवेअरविना टाका पासवर्ड

By देवेश फडके | Published: February 6, 2021 07:32 PM2021-02-06T19:32:49+5:302021-02-06T19:39:57+5:30

विंडोज ऑपरेटिंग सिस्टिममध्ये ही पद्धत बाय डिफॉल्ट, इनबिल्ट आहे. यासाठी अन्य कोणत्याही अतिरिक्त सॉफ्टवेअरची गरज भासत नाही. शिवाय कोणत्याही संगणकावर आपण पासवर्ड बदलूही शकतो.

नवी दिल्ली : माहिती आणि तंत्रज्ञानाचे क्षेत्र झपाट्याने वाढत चालले आहे. माहितीची साठवणूक करण्यासाठी सीडी ते एक्सटर्नल हार्ड डिस्कपर्यंत अनेकविध पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. त्यातील पेनड्राइव्ह हा सर्वांत किफायतशीर आणि वापरायला सोपा पर्याय आहे. महत्त्वाची कागदपत्रे, इमेजेस, प्रोजेक्ट आदी बॅकअप फाइल्स म्हणून पेनड्राइव्हमध्ये सेव्ह करतात.

दिवसभर एकापेक्षा अधिक संगणकावर कार्य करणाऱ्यांसाठी पेनड्राइव्ह हे एक उत्तम साधन आहे. आवश्यक डेटा पेनड्राइव्ह किंवा यूएसबी ड्राइव्हमध्ये संग्रहित असेल तर, त्याला पासवर्डने सुरक्षित करणे अत्यंत महत्वाचे असते. बरेचजण आवश्यक माहिती फोन, टॅब्लेट, हार्ड डिस्क किंवा पेनड्राइव्ह सारख्या वैयक्तिक डिव्हाइसमध्ये संकलित करत असतात.

आपण जतन केलेली माहिती इतरांसोबत शेअर करायची नसल्यास पेनड्राइव्हला पासवर्ड असणे अत्यंत आवश्यक आहे. यूएसबी पेनड्राइव्हच्या सुरक्षिततेसाठी पासवर्ड लागू करण्याच्या सोप्या युक्तींबाबत अनेकांना माहिती नसते. विंडोज ऑपरेटिंग सिस्टिममध्ये ही पद्धत बाय डिफॉल्ट, इनबिल्ट आहे. यासाठी अन्य कोणत्याही अतिरिक्त सॉफ्टवेअरची गरज भासत नाही. शिवाय कोणत्याही संगणकावर आपण पासवर्ड बदलूही शकतो.

सर्वप्रथम आपला यूएसबी पेनड्राइव्ह संगणकाला जोडा. यानंतर, ड्राइव्हवर उजवीकडे क्लिक करा. आता 'Turn on BitLocker' हा पर्याय निवडावा.

'युज पासवर्ड टू प्रोटेक्ट द ड्राईव्ह' वर क्लिक करा. आता लक्षात ठेवायला सोपा असलेला पासवर्ड टाका. हा पासवर्ड दोन्ही ठिकाणी सेट करा.

'सेव्ह द की फॉर फ्युचर रेफरन्स' हा पर्याय येत नाही, तोपर्यंत नेक्स्ट बटणवर क्लिक करा.

यानंतर आपोआप एन्क्रिप्शन प्रक्रियेला सुरुवात होईल. आपण सेट केलेल्या पासवर्डसह पेन ड्राइव्ह सुरक्षित होईल.

आपण पासवर्ड सेट केल्यानंतर, तो कुठेतरी लिहून ठेवाव. जेणेकरून पासवर्ड विसरल्यास तो पुन्हा वापरण्यास आपण सक्षम असाल.