IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 13:11 IST2025-08-20T13:07:48+5:302025-08-20T13:11:48+5:30

टीसीएस, मायक्रोसॉफ्ट, मेटा, गुगल, अमेझॉनसह इतर अनेक कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना नारळ दिले आहे.

IT Sector: हे वर्ष जागतिक तंत्रज्ञान उद्योगासाठी अतिशय वाईट ठरले आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहेत. या बदलांमुळेच या वर्षी आतापर्यंत १७६ कंपन्यांमधील ८० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. याचा परिणाम भारतातही दिसून येत आहे. अनुभवी लोकांनाही आयटी कंपन्यांमधून काढून टाकले जात आहे.

भारतीय आयटी क्षेत्रात ७३ लाख लोक काम करतात, परंतु त्यांना मोठ्या धक्क्यांचा सामना करावा लागत आहे. ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशन इक्विटीजच्या मते, आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीत मोठ्या आयटी सेवा कंपन्यांमध्ये घट झाली आहे. जून २०२० नंतर, म्हणजेच कोविडच्या काळात हे पहिल्यांदाच घडले आहे.

२०२२ हे एकमेव आर्थिक वर्ष आहे, ज्यामध्ये आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भरती झाली. तेव्हापासून, भरती सतत मंदावत आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीत १३,९३५ भरती झाल्या. आता २०२६ मध्ये हा आकडा ७२% ने कमी झाल्याचे म्हटले जाते. २०२२ च्या आर्थिक वर्षात आयटी कंपन्यांनी १० लाख भरती केल्या, मात्र भू-राजकीय दबाव आणि एआयमुळे त्यानंतरच्या काळात भरती सतत कमी होत आहे. गेल्या वर्षी ७,७०० कर्मचाऱ्यांना (ज्यांना १५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव होता) नोकऱ्यांवरून काढून टाकण्यात आले.

इंडस्ट्री ट्रॅकर्सच्या आकडेवारीनुसार, अनेक मोठ्या कंपन्यांनी टाळेबंदी केली आहे. सर्वाधिक टाळेबंदी इंटेलने केली आहे, जी त्यांच्या जागतिक कर्मचाऱ्यांच्या २०% आहे. त्यानंतर मायक्रोसॉफ्टने १५,००० आणि टीसीएसने १२,००० कर्मचाऱ्यांना काढले. याशिवाय, मेटा, गुगल, अमेझॉन यांनीदेखील २० ते २५ हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला.

यासोबतच, जुलैमध्ये क्लावियोने २०%, रेड हॅटने ८०० आणि कोर्वोने २५० जणांना काढले. सेल्सफोर्स, सिस्को, ओरॅकलची संख्या अद्याप समोर आली नाही. यामध्ये अनेक लहान स्टार्टअप्सचाही यामध्ये समावेश आहे.

Ai मुळे नोकऱ्या गेल्या? नोकर कपातीमागील कारण आर्थिक दबाव आणि पुनर्रचना आहे, परंतु एआयचा अवलंब केल्यामुळे हा मोठा बदल देखील आला आहे. नियमित आणि मध्यम-स्तरीय भूमिका वेगाने ऑटोमेडेट होत आहेत, हा बदल बेरोजगारीचे कारण बनत आहे. एकट्या अमेरिकेत, कोविडपासून संपूर्ण उद्योगातून ७,४०,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे, ज्यामध्ये तंत्रज्ञान क्षेत्राचा सर्वात मोठा वाटा आहे.

रीस्किलिंगची गरज- सध्या उद्योगात नवीन कौशल्यांची गरज खूप वाढली आहे. एकीकडे जुन्या पारंपारिक नोकऱ्या संपत आहेत, तर दुसरीकडे एआय अभियांत्रिकी, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा यासारख्या अनेक क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होत आहेत. तुम्ही नवीन कौशल्ये आत्मसात करण्यात अयशस्वी झालात, तर एआयच्या या युगात तुम्ही मागे राहण्याचा धोका आहे.