'लोकेशन ट्रॅकिंग'च्या मदतीनं स्मार्टफोनमधून 'अशी' चोरी केली जाते तुमची माहिती; सुरक्षित कसं राहाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 04:04 PM2021-02-21T16:04:36+5:302021-02-21T16:15:50+5:30

मशीन लर्निंगच्या माध्यमातून काही अॅप्स तुमच्या स्मार्टफोनमध्ये कार्यरत असतात आणि त्यातून तुमची वैयक्तिक माहिती चोरली जाते. यापासून कसा बचाव करायचा? हे जाणून घेऊयात...

बहुतेकवेळा स्मार्टफोन युझर जेव्हा मोबाइल अॅप्सचा वापर करत असतात तेव्हा युझरची नेमकी कोणती माहिती मोबाइल अॅप्स जाणून घेत आहेत याची कल्पना मोबाइल वापरणाऱ्याला नसते. आपण प्रत्येक अॅपला सर्व परमीशन देत सुटतो. पण हेच अतिशय धोकादायक ठरू शकतं.

लोकेशन ट्रॅकिंगच्या माध्यमातून देखील युझरचा डेटा मोबाइल अॅप्स चोरी करतात हे एका अभ्यासातून उघड झालं आहे. यात तुमची वैयक्तीक माहिती देखील चोरली जाते.

युनिव्हर्सिटी ऑफ Bologna आणि लंडनचे दोन संशोधक Benjamin Boron आणि Mirco Musolesi यांनी एखादं मोबाइल अॅप तुमच्यावर कशापद्धतीनं नजर ठेवून असतं याबाबतचा खुलासा केला आहे.

मोबाइल अॅप तुमचा डेटा कसा चोरी करतं हे उघड करण्यासाठी या दोघांनी एक मोबाइल अॅप्लिकेशन तयार केलं आहे. ज्यात युझरचं लोकेशन ट्रॅक करुन अॅप्स कशापद्धतीनं वैयक्तीक माहिती चोरी करतात हे सिद्ध होतं. मोबाइलमधले कोणकोणते अॅप्स तुमची माहिती जाणून घेत आहेत याची माहिती हे अॅप्लिकेशन देतं.

मशीन लर्निंगच्या माध्यमातून हे अॅप तुमच्या मोबाइलमधील सर्व अॅप्सची माहिती तुम्हाला देतं. या ट्रॅक अॅडव्हायझर अॅपने सलग दोन आठवडे याची चाचणी केली. ट्रॅक अॅडव्हायझरनं तब्बल २ लाख लोकेशन्स ट्रेस केली. यात २५०० ठिकाणांची ५ हजार पॉइंट्सच्या माहितीचा समावेश होता.

संपूर्ण माहितीचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की लोकांचं आरोग्य, धर्म, आर्थिक परिस्थिती यासंदर्भातील माहिती मोबाइल अॅप्स जाणून घेत असल्याचं निष्पन्न झालं आहे.

लोकेशन ट्रॅकिंगच्या सहाय्याने आम्ही लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला की कशाप्रकारे मोबाइल अॅप्स तुमच्याबद्दलची कोणकोणती माहिती गोळा करत आहेत.

तुम्हाला जर तुमची वैयक्तीक माहिती सुरक्षित ठेवायची असेल तर अशा बेभरवशाच्या अॅप्सना डाउनलोड करू नका किंवा डाउनलोड केलंच तर त्यांना माहितीचा अॅक्सेस करण्याची परवानगी देऊ नका, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

आपण जर एखाद्या अॅपला परवानगीच दिली नाही. तर ते अॅप तुमच्या मोबाइलमधील कोणतीही माहिती जाणून घेऊ शकत नाही. कारण आता यूझरची गोपनीयता ही अतिशय महत्वाची गोष्ट बनली आहे.