एकच नंबर! आता गुगल मॅप्स पेट्रोल, डिझेलचा खर्च वाचवणार; खिशावरचा भार कमी करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 05:54 PM2021-10-07T17:54:37+5:302021-10-07T17:57:26+5:30

गुगल मॅप्सच्या नव्या अपडेटमध्ये नवं फीचर; इंधन खर्च कमी होणार

गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये मोठी वाढ सुरू आहे. सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसला आहे. पेट्रोलनं केव्हाच शतक पार केलं आहे. तर डिझेलनं नुकतीच शंभरी ओलांडली आहे.

पेट्रोल, डिझेलच्या किमती सातत्यानं वाढत असल्यानं सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. इंधन दरवाढीमुळे खिशावर अधिकचा भार पडत आहे. या परिस्थितीत गुगल मॅप्स भारतीयांच्या मदतीला धावलं आहे.

इंधनाच्या दरवाढीमुळे अनेक जण पेट्रोल, डिझेल वाचवण्याचे फंडे शोधत आहेत. काहींनी तर वाहनांचा वापरच कमी केला आहे. मात्र गुगल मॅप्समध्ये येत असलेल्या नव्या फीचरमुळे पेट्रोल, डिझेलवरील खर्च काही प्रमाणात वाचणार आहे. नव्या अपडेटमध्ये हे फीचर असेल.

गुगल मॅप्समधलं नवं फीचर इंधनाची बचत करणारे मार्ग सुचवेल. या रस्त्यांमुळे तुमच्या इंधनाची बचत तर होईलच, शिवाय तुम्ही वेळेत तुम्हाला हव्या असलेल्या ठिकाणी पोहोचाल. यामुळे गुगल मॅप्स कार्बन उत्सर्जन कमी करण्यासही मदत करेल.

अमेरिकेत गुगल मॅप्सनं इंधनाची बचत करणारं फीचर सुरू केलं आहे. युरोप आणि इतर देशांमध्ये येत्या काही महिन्यांत हे फीचर उपलब्ध होईल. अँड्रॉईड आणि आयओएसवर वापरकर्त्यांना या फीचरचा उपयोग करता येईल.

गुगल मॅप्स आता सायकल चालवणाऱ्यांसाठी वेगळं फीचर आणणार आहे. जगभरात सायकलिंग करणाऱ्यांचं प्रमाण ९८ टक्क्यांनी वाढलं आहे. त्यामुळे गुगल मॅप्स नवं फीचर उपलब्ध करून देणार आहे.

सध्याच्या घडीला गुगल मॅप्सवर कार, बाईक, ट्रेन, बसने जाणाऱ्यांसाठी मार्ग उपलब्ध आहेत. पायी जाणाऱ्यांही गुगल मॅप्स मार्ग दाखवतो. पण सायकलस्वारांसाठी कोणतीही सोय उपलब्ध नाही. ती लवकरच उपलब्ध होणार आहे.