BSNLची दुरावस्था का आणि कुणामुळे झाली..? एकेकाळी प्रचंड नफा; आज 90 हजार कोटींचा घाटा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 03:15 PM2022-07-28T15:15:30+5:302022-07-28T15:29:37+5:30

BSNLची सुरुवात 1 ऑक्टोबर 2000 ला झाली. एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात मक्तेदारी असलेल्या या कंपनीची आज अतिशय वाईट अवस्था झाली आहे.

आजही जिथे इतर टेलिकॉम ऑपरेटरचे नेटवर्क मिळत नाही, तेथे बीएसएनएलचे(BSNL) सिग्नल मिळते. याचे कारण म्हणजे, बीएसएनएलचे कव्हरेज इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे. पण गेल्या काही वर्षात नेमकं काय झालं, ज्यामुळे बीएसएनएल इतर ऑपरेटरच्या तुलनेत मागे पडला. आणि आज 5-जी स्पेक्ट्रमच्या लिलावात बीएसएनएलचा समावेश का नाही? बीएसएनएलची अवस्था अशी का झाली?

BSNL म्हणजे भारत संचार निगम लिमिटेड, ही सरकारी दूरसंचार कंपनी आहे. व्हेंटिलेटरवर पोहोचलेल्या या कंपनीची आज अशी अवस्था एका दिवसात झालेली नाही. 1 ऑक्टोबर 2000 ला सुरू झालेल्या बीएसएनएलची एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात मक्तेदारी होती. पण, आज या कंपनीची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. सरकार बीएसएनएलला बंद होण्यापासून वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

बुधवारी मंत्रिमंडळाने बीएसएनएल आणि बीबीएनएल (भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड) च्या विलीनीकरणाला हिरवा सिग्नल दिला आहे. तसेच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी BSNL साठी 1,64,156 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले आहे. रिलीफ पॅकेजद्वारे आज आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या या कंपनीची अशी अवस्था कशामुळे झाली? यासाठी आपल्याला दोन दशके मागे जावे लागेल.

BSNL म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेड 1 ऑक्टोबर 2000 रोजी सुरू झाली. ज्यांच्या मनात 2000 च्या आठवणी आहेत त्यांना बीएसएनएलचा सुवर्णकाळही आठवेल. तेव्हा आजच्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या घरात फोन नसायचा. संपूर्ण कुटुंब किंवा परिसरातील एखाद्या व्यक्तीकडे मोबाईल फोन होता. 2000 च्या सुमारास लँडलाईनची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. पण मोबाईल क्वचितच कुणाकडे दिसायचा.

बीएसएनएलचे सिम कार्ड घेण्यासाठी अनेक दिवस रांगेत उभे राहावे लागायचे. धडपड करुन सिम कार्ड मिळायचे, पण कॉलिंगसाठी 1 रुपये प्रति मिनिट दर आकारला जायचा. हळूहळू खाजगी कंपन्या या क्षेत्रात येऊ लागल्या आणि बीएसएनएलचे वाईट दिवस सुरू झाले. एकेकाळी नफ्यावर नफा कमावणारी ही कंपनी हळूहळू तोट्यात गेली.

2009-10 पासून बीएसएनएल तोट्यात जाऊ लागली. बीएसएनएलला तोटा सहन करण्याचे हे पहिलेच वर्ष होते. रिलायन्स आणि एअरटेलसारख्या खासगी कंपन्यांनी बाजारात प्रवेश केला होता. आता काळही बदलला होता, फीचर फोनची जागा स्मार्टफोनने घ्यायला सुरुवात केली होती. त्याचबरोबर दूरसंचार कंपन्यांची पोहोच दूरवर पोहचली होती. या काळात इंटरनेट आणि फोनवर कॉलिंगसाठी रेट कटरचा ट्रेंड होता.

एक-दोन नव्हे तर अनेक खासगी कंपन्या एकापेक्षा जास्त योजना आणि एफआरसी घेऊन बाजारात आल्या. त्या काळात ग्राहकांना रिचार्जपेक्षा स्वस्तात नवीन सिम मिळायचे. अशा परिस्थितीत बीएसएनएल सातत्याने प्रतिस्पर्ध्यांच्या मागे पडू लागली. 2009-10 या आर्थिक वर्षापासून सुरू झालेला बीएसएनएलचा तोट्याचा टप्पा आजतागायत थांबला नसून आता कंपनीला वाचवण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे.

2009पासून आजपर्यंत कंपनीने नफा पाहिलेला नाही. 2019-20 या आर्थिक वर्षात कंपनीचा तोटा 15,500 कोटींवर पोहोचला होता. यानंतर ही कंपनी बंद होणार असल्याचे दिसत होते. आता ही कंपनी पुन्हा एकदा नफ्यात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. 2021 मध्ये कंपनीला 40 हजार कोटींचे रिलीफ पॅकेज मिळाले. यातील निम्मी रक्कम अल्पमुदतीचे कर्ज फेडण्यासाठी गेली. 2022 मध्ये सरकारने बीएसएनएलला मोठे मदत पॅकेज दिले आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनीची ही अवस्था अनेक कारणांमुळे झाली आहे. यामध्ये मोठी भूमिका लालफिती आणि हळूहळू घेतलेल्या निर्णयांमुळे झाली. 2021 पूर्वी कंपनीचा सर्वाधिक खर्च कर्मचाऱ्यांवर होत होता. कंपनीचा सुमारे 55 ते 60 टक्के खर्च त्यात जात असे. 2016 मध्ये जिओच्या आगमनानंतर टेलिकॉम इंडस्ट्रीत मोठा बदल झाला. 4G नेटवर्क झपाट्याने विस्तारले आणि लोकांचे लक्ष इंटरनेटवर केंद्रित झाले.

दूरसंचार उद्योगात पूर्वी रेट कटर आणि कमी कॉलिंग शुल्क असलेल्या योजनांचा दबदबा होता. आता 4G डेटा आणि OTT बंडल आले. इतर कंपन्या 5G आणत आहेत, तर अद्याप 4G सेवाही आणू न शकलेली बीएसएनएल दररोज या शर्यतीत मागे पडत चालली आहे. हा देखील कंपनीच्या व्यवस्थापनाचा चुकीचा निर्णय होता. आजही कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये इतर कंपन्यांपेक्षा स्वस्त प्लॅन्स आहेत, परंतु 4G नेटवर्कची सुविधा नसल्यामुळे बीएसएनएलला सतत मागे जात आहे.

जिथे इतर दूरसंचार कंपन्या 5G स्पेक्ट्रमच्या शर्यतीत सामील आहेत, तिथे बीएसएनएल अद्याप 4 जी सेवा देऊ शकली नाही. 4G सेवा रोलआउट या वर्षाच्या अखेरीस होणार होती, परंतु नुकत्याच आलेल्या एका अहवालात हा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याचे कळते. अहवालानुसार, BSNL 4G साठी अजून 18 ते 24 महिने प्रतीक्षा करावी लागेल.