सावधान! तुमच्या Google अकाउंटवर कोणाची चोरटी नजर तर नाही? 'असा' करा बचाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 19:59 IST2026-02-10T19:49:10+5:302026-02-10T19:59:48+5:30
जर तुमच्या गुगल अकाउंटचा ताबा एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे गेला, तर तुमची 'प्रायव्हसी' पूर्णपणे धोक्यात येऊ शकते.

आजच्या डिजिटल युगात आपले गुगल अकाउंट हे केवळ एका ईमेलपुरते मर्यादित राहिलेले नाही. तुमचे व्हॉट्सॲप बॅकअप, खाजगी फोटो, महत्त्वाचे दस्तऐवज, व्हिडिओ आणि बँक व्यवहारांशी संबंधित माहिती याच एका अकाउंटशी जोडलेली असते. अशा परिस्थितीत, जर तुमच्या गुगल अकाउंटचा ताबा एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे गेला, तर तुमची 'प्रायव्हसी' पूर्णपणे धोक्यात येऊ शकते. म्हणूनच, आपले अकाउंट कोणकोणत्या डिव्हाइसेसमध्ये लॉग-इन आहे, हे वेळोवेळी तपासणे आता अनिवार्य झाले आहे.

अनेकदा हॅकर्स किंवा सायबर चोरटे तुमच्या नकळत तुमच्या अकाउंटमध्ये लॉग-इन होतात. तुमच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, तुमचे ईमेल वाचणे किंवा तुमचे फोटो पाहणे त्यांना सहज शक्य होते. जोपर्यंत मोठे नुकसान होत नाही, तोपर्यंत आपल्याला याची भनकही लागत नाही. हीच भीती लक्षात घेऊन गुगलने एक खास सुरक्षा फिचर दिले आहे, ज्याद्वारे तुम्ही काही मिनिटांतच सत्य जाणून घेऊ शकता.

तुमच्या अकाउंटमध्ये कोणी घुसखोरी केली आहे का, हे पाहण्यासाठी 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करा. पहिला तुमच्या स्मार्टफोनमधील 'Google' किंवा 'Gmail' ॲप उघडा. त्यानंतर वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तुमच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करा. त्यात 'Manage your Google Account' या पर्यायावर टॅप करा. वरच्या मेन्यूमध्ये स्क्रोल करून 'Security' टॅब निवडा.

खाली गेल्यावर तुम्हाला 'Your Devices' हा विभाग दिसेल. तिथे 'Manage all devices' वर क्लिक करा. येथे तुम्हाला त्या सर्व मोबाईल, लॅपटॉप किंवा टॅब्लेटची यादी दिसेल जिथे तुमचे अकाउंट सध्या सुरू आहे. जर या यादीत तुम्हाला एखादे अनोळखी डिव्हाइस दिसले, तर त्यावर क्लिक करून त्वरित 'Sign Out' करा.

फक्त लॉग-आउट करून चालणार नाही, तर तुमचे अकाउंट 'हॅक-प्रुफ' करण्यासाठी 'Two-Step Verification' हे फिचर नेहमी ऑन ठेवा. यामुळे तुमच्या पासवर्डशिवाय किंवा ओटीपी टाकल्याशिवाय कोणालाही लॉग-इन करता येणार नाही.

या पासवर्डमध्ये तुमचे नाव, जन्मतारीख किंवा मोबाईल नंबर कधीही ठेवू नका. तो अक्षरे, अंक आणि चिन्हांचा (उदा. @, #, $) मिलाफ असावा. दर ३ ते ६ महिन्यांनी तुमचा पासवर्ड बदलण्याची सवय लावून घ्या. तुमची एक छोटीशी सावधगिरी तुम्हाला मोठ्या आर्थिक आणि मानसिक त्रासापासून वाचवू शकते.

















