वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 18:09 IST2025-09-10T18:03:36+5:302025-09-10T18:09:26+5:30
आजकाल वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन कामांमुळे प्रत्येक घरात वाय-फाय असणे सामान्य झाले आहे. परंतु, अनेकदा चांगली स्पीड असूनही इंटरनेट स्लो चालते, व्हिडिओ अडखळतात आणि पेजेस उघडायला वेळ लागतो.

आजकाल वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन कामांमुळे प्रत्येक घरात वाय-फाय असणे सामान्य झाले आहे. परंतु, अनेकदा चांगली स्पीड असूनही इंटरनेट स्लो चालते, व्हिडिओ अडखळतात आणि पेजेस उघडायला वेळ लागतो. तुम्हाला वाटत असेल की ही समस्या फक्त तुमच्या इंटरनेट कंपनीमुळे होते, पण अनेकदा राउटर ठेवण्याची जागा किंवा त्याच्या जवळ ठेवलेल्या वस्तूही यामागचे कारण असू शकतात.
आरसा आणि धातूच्या वस्तू : वाय-फाय सिग्नल रेडिओ लहरींवर काम करतात. जर तुमच्या राउटरच्या जवळ मोठा आरसा असेल, तर या लहरी परावर्तित होऊन दिशा बदलतात, ज्यामुळे सिग्नल कमकुवत होतात. त्याचप्रमाणे, धातूच्या वस्तू, जसे की लोखंड किंवा स्टीलचे फर्निचर, रेडिओ लहरींना अडवतात आणि सिग्नलची ताकद कमी करतात. त्यामुळे, राउटर कधीही आरसा किंवा धातूच्या वस्तूंजवळ ठेवू नका.
ब्लूटूथ डिव्हाइस : ब्लूटूथ डिव्हाइस आणि वाय-फाय दोन्ही २.४ गिगाहर्ट्ज फ्रिक्वेन्सीवर काम करतात. यामुळे, जर तुमच्या राउटरच्या जवळ ब्लूटूथ स्पीकर, माउस, कीबोर्ड किंवा इतर कोणतेही गॅजेट असेल, तर त्यांच्या सिग्नलमध्ये हस्तक्षेप होतो. यामुळे इंटरनेटचा स्पीड कमी होतो. हे टाळण्यासाठी, अशी डिव्हाइस राउटरपासून थोड्या दूर अंतरावर ठेवा.
बंद जागा आणि कपाट : फर्निचर किंवा लाकडी कपाटासारख्या बंद जागाही वाय-फाय नेटवर्कसाठी शत्रू बनू शकतात. जर तुम्ही राउटरला लाकडी रॅक किंवा कपाटात ठेवले असेल, तर सिग्नल बाहेर योग्य प्रकारे पोहोचू शकत नाहीत, ज्यामुळे कनेक्टिव्हिटी खूप कमजोर होते. राउटर नेहमी मोकळ्या आणि थोड्या उंच जागी ठेवा, जेणेकरून सिग्नल सर्व दिशांमध्ये समान पसरतील.
मायक्रोवेव्ह ओव्हन : किचनमध्ये असलेले मायक्रोवेव्ह ओव्हनही वाय-फायच्या स्पीडला स्लो करू शकते. मायक्रोवेव्ह सुद्धा २.४ गिगाहर्ट्जवर काम करतो आणि त्यातून रेडिएशन लीक होते, ज्यामुळे वाय-फाय सिग्नल कमजोर होतात. त्यामुळे, तुमचा राउटर मायक्रोवेव्ह किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर ठेवा.
भिंती आणि फरशी : तुम्ही तुमच्या घराच्या भिंतींना पेंट लावलेला असतो, जो सिग्नल्सना अडवतो. अशावेळी जाड भिंती आणि फरशीमुळे इंटरनेट स्लो होते. त्यामुळे राउटरला घराच्या मधोमध ठेवा.
चांगला इंटरनेट स्पीड मिळवण्यासाठी फक्त चांगला प्लान घेणे पुरेसे नाही, तर राउटर कुठे आणि कसा ठेवला आहे, हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. वरील गोष्टी टाळल्यास तुमच्या वाय-फायचा वेग नक्कीच वाढेल.