Chinnu Pappu : कोण होती चिन्नू पप्पू? अवघ्या २४ व्या वर्षी मृत्यू; महिनाभरापूर्वी झाला घटस्फोट, ४ वर्षांची लेक पोरकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 13:31 IST2026-02-10T12:46:48+5:302026-02-10T13:31:16+5:30

Chinnu Pappu : प्रसिद्ध डिजिटल कंटेंट क्रिएटर 'चिन्नू पप्पू'चा मृत्यू झाला आहे. तिचं खरं नाव के. रेश्मा होतं.

सोशल मीडियाच्या झगमगत्या दुनियेतून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रसिद्ध डिजिटल कंटेंट क्रिएटर 'चिन्नू पप्पू'चा मृत्यू झाला आहे. तिचं खरं नाव के. रेश्मा होतं.

अवघ्या २४ व्या वर्षी तिच्या मृत्यूच्या बातमीने इंटरनेट जगताला आणि तिच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चिन्नू पप्पूने इतक्या कमी वयात हे टोकाचं पाऊल का उचललं? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. कासारगोडमधील अडूर येथील रहिवासी असलेल्या रेश्माचा मृतदेह तिच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

दुपारच्या वेळी जेव्हा शेजाऱ्यांना काहीतरी अघटीत घडल्याचा संशय आला, तेव्हा त्यांनी तातडीने तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांना या घटनेची माहिती दुपारी २ वाजेच्या सुमारास मिळाली, त्यानंतर त्यांनी रेश्माच्या पालकांना याची माहिती दिली.

चिन्नू पप्पू ही प्रामुख्याने दक्षिण भारतातील विशेषतः केरळमधील एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर होती. कासारगोड जिल्ह्यातील अडूर येथील रहिवासी होती.

चिन्नूचे इन्स्टाग्रामवर तब्बल २ लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. ती प्रामुख्याने स्थानिक भाषा आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणारे विविध व्हिडीओ बनवायची.

तिच्या कंटेंटचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ती स्थानिक पाककृती अत्यंत साध्या, सोप्या पद्धतीने सादर करायची. तिच्या व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळायचे आणि तरुणांमध्ये ती प्रचंड लोकप्रिय होती.

खूप कमी वयात सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली होती. चुलीवर स्वयंपाक करणं किंवा पारंपारिक पद्धतीने जेवण बनवतानाचे तिचे व्हिडीओ खूप व्हायरल व्हायचे.

चिन्नूच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, परंतु प्राथमिक तपासानुसार तिच्या वैयक्तिक आयुष्यात मोठी उलथापालथ सुरू होती. असं सांगितलं जात आहे की, चिन्नू विवाहित होती, महिनाभरापूर्वीच तिचा पतीसोबत घटस्फोट झाला होता.

चिन्नूला चार वर्षांची एक लहान मुलगी देखील आहे, जी सध्या अडूर येथे तिच्या आजी-आजोबांकडे राहत आहे. कासारगोड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

घटस्फोट आणि मानसिक ताण हेच आत्महत्येचं मुख्य कारण होतं की त्यामागे आणखी काही आहे? याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस तिच्या सोशल मीडिया अकाउंट्स आणि फोनचीही कसून तपासणी करत आहेत.