Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 15:58 IST2025-05-25T15:35:27+5:302025-05-25T15:58:15+5:30
Harsha Richhariya : महाकुंभमध्ये सुरुवातीपासूनच हर्षा रिछारिया हे नाव जोरदार चर्चेत आलं होतं.

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील महाकुंभमध्ये सुरुवातीपासूनच हर्षा रिछारिया हे नाव जोरदार चर्चेत आलं होतं. ३० वर्षीय हर्षाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, सर्वांना तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
महाकुंभात प्रवेश करताना हर्षा निरंजनी आखाड्याच्या रथावर बसलेली देखील दिसली होती. यावरून वाद सुरू झाला. काही संतांनी हर्षाच्या रथावर बसण्यावर आणि भगवे कपडे परिधान करण्यावर आक्षेप घेतला.
हा वाद इतका वाढला आहे की, हर्षा रिछारियाने ढसाढसा रडत महाकुंभ सोडण्याची घोषणा केली आहे. हर्षाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबतची माहिती दिली. महाकुंभ सोडण्यामागची कारणं सांगितली आहेत.
हर्षाने एनडीटीव्हीला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत तिच्या जीवन प्रवासाबद्दल, संघर्षांबद्दल आणि अचानक मिळालेल्या सार्वजनिक ओळखीबद्दल मोकळेपणाने सांगितलं. महाकुंभमुळे तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं. ज्याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती असं म्हटलं आहे.
“पूर्वी माझं आयुष्य खूप सुरळीत होतं. मला माहित होतं की, मी एका महिन्यात इतके शो करेन, तेवढे मला पैसे मिळतील. ना ट्रोलिंग, ना प्रश्न, ना अपेक्षा... सगळं काही संतुलित होतं.”
“महाकुंभाच्या व्यासपीठावरून मिळालेल्या व्यापक प्रसिद्धीमुळे दैनंदिन जीवन, विचारसरणीची आणि जबाबदाऱ्यांची व्याख्याच बदलून गेली. ओळख मिळाल्यामुळे लोकांच्या अपेक्षा आणि दृष्टिकोनही बदलला. आता लोक माझ्याकडे त्याच आशेने पाहतात. जबाबदारीचा तो दृष्टिकोन माझं संपूर्ण जग बदलून टाकतो.”
“कधीकधी खूप जास्त, कधी खूप कमी… मी पहिल्यांदाच हे चढ-उतार अनुभवत आहे. कधी सगळं ठीक आहे असं वाटतं, तर कधी असं वाटतं की हे सगळं का घडलं? महादेवांनी मला खूप ओळख दिली… आता मी ते वाया जाऊ देऊ इच्छित नाही.”
“आज सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं, प्रश्न विचारले जातात किंवा पाठिंबा आणि टीका दोन्ही सहन करावी लागते तरीही मी मागे हटत नाही. मी माझी नवीन भूमिका "धार्मिक जबाबदारी" म्हणून स्वीकारली आहे” असं हर्षा रिछारियाने म्हटलं आहे.