By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 11:16 IST
1 / 12Sleeper Vande Bharat Train Catering Services: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित स्लीपर वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आली आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनची २२ जानेवारी २०२६ रोजी कामाख्या येथून आणि २३ जानेवारी २०२६ रोजी हावडा येथून नियमित सेवा सुरू झाली. यातच पहिल्या फेरीपासून स्लीपर वंदे भारत ट्रेनचे तिकीट बुकिंग वेटिंग लिस्टवर गेले आहे. प्रवाशांनी स्लीपर वंदे भारत ट्रेनला तुफान प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे. 2 / 12स्लीपर वंदे भारत ट्रेन कामाख्या येथून सायंकाळी ०६ वाजून १५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०८ वाजून १५ मिनिटांनी हावडा जंक्शन येथे पोहोचेल. बुधवार वगळता अन्य सर्व दिवस स्लीपर वंदे भारत गुवाहाटी कामाख्या येथून सुटेल. 3 / 12वंदे भारत स्लीपर ही एक सेमी-हाय-स्पीड ट्रेन आहे ज्यामध्ये एकूण १६ कोच आहेत, ज्यामध्ये ११ थर्ड एसी, ४ सेकंड एसी आणि १ फर्स्ट एसी कोच आहे. थर्ड एसीमध्ये ६११ बर्थ, १८८ सेकंड एसी आणि २४ फर्स्ट एसी बर्थ आहेत. स्लीपर वंदे भारत ट्रेनचे तिकीट दर 3rd AC श्रेणीचे दर जेवणासह सुमारे ₹२,३०० असेल. 2nd AC श्रेणीचे दर सुमारे ₹३,००० आणि 1st AC श्रेणीचे दर सुमारे ₹३,६०० असेल.4 / 12आसाममधील कामाख्या आणि पश्चिम बंगालमधील हावडा या मार्गावरील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची सेवा सुरू झाली. स्लीपर वंदे भारत ट्रेन भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी सर्वांत वेगवान ट्रेन आहे. ही ट्रेन अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. यातच कामाख्या-हावडा वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये फक्त शाकाहारी जेवण दिले जाते का? नॉनव्हेज जेवण उपलब्ध नाही का? या मुद्द्यामुळे भाजपा आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचे पाहायला मिळत आहेत.5 / 12स्लीपर वंदे भारत ट्रेन रात्रीचा प्रवास करते. या ट्रेनच्या खानपान सेवेत फक्त शाकाहारी पदार्थांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. भारतीय रेल्वेच्या मते, हा निर्णय घेण्यात आला कारण, ही ट्रेन कामाख्या मंदिर (आसाम) आणि काली मंदिर (पश्चिम बंगाल) दोन पवित्र स्थळांना जोडते. पश्चिम बंगाल आणि आसाममधील पारंपारिक पदार्थ या ट्रेनमध्ये प्रवाशांना दिले जातात. 6 / 12वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या मेन्यूमध्ये बसंती पुलाव, छोले दाल, मूग दाल, चना आणि ढोकर सब्जी असे बंगाली पदार्थ समाविष्ट आहेत. आसामी पदार्थांमध्ये जोहा भात, मसूर दाल आणि हंगामी भाज्यांची करी समाविष्ट आहे. संदेश आणि रसगुल्ला सारख्या पारंपारिक मिठाई देखील उपलब्ध आहेत. नॉनव्हेज पर्याय नसल्यामुळे अनेक प्रवासी नाराज आहेत, असे म्हटले जात आहे.7 / 12तृणमूल काँग्रेस पक्षाने या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, पूर्वी ते आमच्या मतांवर नजर ठेवून होते, आता ते आमच्या ताटांवर नजर ठेवून आहेत. यावर प्रदेश भाजपा अध्यक्ष समिक भट्टाचार्य म्हणाले की, या मुद्द्याचे राजकारण करणे पूर्णपणे अनावश्यक आहे. प्रवाशांना मांसाहारी जेवण हवे असेल तर त्यांनी ते रेल्वेकडे मागावे. यात भाजपचा काय संबंध? तृणमूल सरकारने राज्याच्या मध्यान्ह भोजन योजनेतून अंडी काढून टाकली. तेव्हा टीएमसीला अन्न विविधतेची आठवण झाली नाही.8 / 12देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये फक्त शाकाहारी जेवणच दिले जाते का? जेव्हा कामाख्या आणि हावडा दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी ऑनलाइन तिकिटे बुक करण्याची प्रक्रिया www.irctc.co.in वर लॉग इन करून सुरू करण्यात आली तेव्हा जेवणाचा पर्याय देण्यात आला नव्हता.9 / 12याचा अर्थ असा की इतर ट्रेनप्रमाणे, वंदे भारत स्लीपरमध्ये जेवणाचे पर्याय निवडण्याची सुविधा दाखवली जात नाही. ऑनलाइन बुकिंग करताना, एक संदेश येतो की, खानपान सेवा ही वेळेच्या अधीन आहेत. म्हणून कामाख्या-हावडा वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये फक्त शाकाहारी जेवण दिले जाते की, नॉनव्हेज पर्याय उपलब्ध नाही, याची अधिकृतपणे पुष्टी होऊ शकलेली नाही.10 / 12विशेष म्हणजे दिल्ली आणि अयोध्या दरम्यान धावणाऱ्या चेअर कार वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन जेवणाचे पर्याय देते. शाकाहारी, जैन आणि शाकाहारी मधुमेहींसाठी जेवण असे पर्याय उपलब्ध आहेत. या चेअर कार वंदे भारत ट्रेनमध्ये नॉनव्हेजचा पर्याय नाही.11 / 12नवी दिल्ली ते कटरा, पाटणा, हावडा दरम्यान धावणाऱ्या चेअर कार वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्येही नॉनव्हेज पर्याय दिला जात नाही, असे म्हटले जात आहे. इतर नियमित ट्रेनमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही पर्याय दिले जातात. नवी दिल्ली (पाटणा मार्गे) आणि हावडा दरम्यान धावणाऱ्या दुरांतो एक्सप्रेस ट्रेनमध्ये दोन्ही पर्याय दिले जातात. परंतु वंदे भारत एक्सप्रेसमध्ये हा पर्याय उपलब्ध नाही.12 / 12दरम्यान, एकूण ८२३ प्रवाशांना घेऊन जाणारी स्लीपर वंदे भारत ट्रेन १८० किमी प्रति तास वेगाने धावण्यास सक्षम आहे. पुढील सहा महिन्यांत आणखी ८ वंदे भारत स्लीपर ट्रेन येतील, तर वर्षभरात एकूण १२ ट्रेन सुरू केल्या जाणार आहेत. भारतीय रेल्वे २०० हून अधिक वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा रोडमॅप तयार करत आहे.