Coronavirus: लॉकडाऊनचं उल्लंघन करत नमाज अदा करण्यासाठी मशिदीत जमले शेकडो लोक अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 06:52 PM2020-04-11T18:52:24+5:302020-04-11T18:57:05+5:30

कोरोना विषाणूचा धोका कमी करण्यासाठी 25 मार्चपासून देशात लॉकडाऊन लागू आहे. परंतु या काळात लॉकडाऊन तोडल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. शुक्रवारी लॉकडाऊनचं उल्लंघन करुन सोशल डिस्टेंसिंग न पाळता अनेक लोक पश्चिम बंगालमधील एका मशिदीत नमाज अदा करण्यासाठी जमले होते.

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादच्या मशिदीत पोहोचलेल्या बर्‍याच लोकांनी मास्कसुद्धा घातला नव्हता.

मशिदीत नमाजसाठी जमलेले लोक एकमेकांपासून विशिष्ट अंतरदेखील राखत नव्हते. मात्र, पोलिसांनी त्यांना बाहेर पडण्यास सांगितले तेव्हा लोकांनी मशिद खाली केली.

मुर्शिदाबाद हा पश्चिम बंगालमधील अल्पसंख्याक बहुल जिल्हा आहे. येथील गोपीपूर मशिदीत नमाज अदा करण्यासाठी शुक्रवारी लोक जमले होते.

मशिदीत लोक जमल्याची माहिती एका अधिकाऱ्याला समजताच ते तातडीने घटनास्थळी पोहचले आणि मशिदीच्या इमाम तस्लीम राजाला लॉकडाऊनचं पालन करण्याची सूचना दिली.

भविष्यात पुन्हा लॉकडाऊन उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा स्थानिक अधिकाऱ्याने इमाम तस्लीम राजाला दिला.

मुर्शिदाबादची मशिद रिकामी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल होत आहे. वेळेवर कारवाई केल्याबद्दल बरेच लोक पोलिसांचे कौतुक करत आहेत

पश्चिम बंगालमधील 116 हून अधिक लोकांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. दिल्लीच्या निजामुद्दीनच्या तबलीगी जमातच्या मरकज येथे धार्मिक कार्यक्रमात जमलेले अनेक सदस्य भारताच्या विविध राज्यात गेले आहेत. यातील काही जणांना कोरोनाची लागण असल्याचं समोर आलं आहे.

देशातील बर्‍याच राज्यांत तबलीगी जमातशी संबंधित काही लोकांचा शोध अजूनही घेण्यात येत आहे. त्याच वेळी जुन्या दिल्लीतील चांदनी महाल भागातील 13 मशिदींमधून 102 जमातींना काढण्यात आल्या. त्यापैकी 52 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

बर्‍याच राज्यांत कोरोना व्हायरसचे हॉटस्पॉट सील करण्याचे कामही सुरू झाले आहे. लोकांना सीलबंद भागातून बाहेर येण्यास मनाई आहे.