'जुगाड जिप्सी'तून चक्क मंत्रीमहोदयांनी मारली रपेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 06:51 PM2022-01-04T18:51:21+5:302022-01-04T18:57:05+5:30

विश्वजीत कदम यांच्या कडेगाव पलूस मतदारसंघातील रहिवाशी असल्याने कदम यांनी त्यांच्या कल्पतेचं कौतुक केलं. तसेच, त्यांना गाडीसाठीचा खर्चही देऊ केला आहे.

सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील देवराष्टे येथील दत्तात्रय लोहार यांनी एक भन्नाट चारचाकी गाडी बनवली आहे. भंगार आणि दुचाकीच्या भागांपासून बनवलेल्या या कारच्या प्रयोगाचे 'दैनिक लोकमत'मध्ये वृत्त प्रकाशित केले होते.

या कारच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला. त्यानंतर लोहार यांनी बनवलेल्या या कारची दखल चक्क महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी घेतली. त्यांनंतर, आता राज्याचे मंत्री आणि स्थानिक आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनीही या जुगाड जिप्सीची दखल घेत दत्तात्रय लोहार यांचं कौतुक केलं.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी, माझ्या मतदारसंघातील देवराष्ट्रे या गावच्या दत्तात्रय लोहार यांनी उपक्रमशीलतेतून बनवलेल्या चार चाकी गाडीबद्दल मी कौतुक करतो. त्यासाठीचा ६० ते ७० हजाराचा खर्च मी माझ्या ट्रस्टच्या माध्यमातून देत असल्याचे जाहीर करतो, असे ट्विट विश्वजीत कदम यांनी केलं होतं.

विश्वजीत कदम यांनी नवीन वर्षातील पहिल्याच आठवड्यात दत्तात्रय लोहार यांची भेट घेऊन त्यांच्या जुगाड जिप्सीतून फेरफटकाही मारला आहे. त्यावेळी, त्यांची मुलेही गाडीत बसली होती.

कदम यांनी लोहार यांच्या कल्पकता आणि उपक्रमशीलतेचे प्रत्यक्ष भेटून कौतुक केले. लोहार कुटुंबीयांशीही या वेळी संवाद साधला आणि मुलाला पुस्तक भेट दिले.

विश्वजीत कदम यांच्या कडेगाव पलूस मतदारसंघातील रहिवाशी असल्याने कदम यांनी त्यांच्या कल्पतेचं कौतुक केलं. तसेच, त्यांना गाडीसाठीचा खर्चही देऊ केला आहे.