सांगलीत आहे किल्लीच्या आकाराची 'ही' पेशवेकालीन विहीर; यात आहेत 2 भूयार, 2 प्रवेश द्वार अन् बरच काही!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 05:15 PM2021-08-03T17:15:48+5:302021-08-03T17:29:39+5:30

एखाद्या कुलुपाच्या किल्लीसारखी दिसणारी ही विहीर पेशवेकालीन असून परिसरात ती नानाची विहीर म्हणूनही ओळखली जाते. (Peshwa period key shaped well)

सांगली जिल्ह्यात बारव शोध मोहीमेत संशोधकांनी एका किल्लीच्या आकाराच्या विहीरीवर प्रकाश टाकला आहे. ही विहीर हुबेहूब एखाद्या किल्लीच्या आकाराची आहे. येथील विजयनगरमधील कुंभार मळ्यात असलेली ही विहीर गणपती कुंभार यांच्या मालकीची आहे. (Peshwa period key shaped well in Sangli district)

एखाद्या कुलुपाच्या किल्लीसारखी दिसणारी ही विहीर पेशवेकालीन असून परिसरात ती नानाची विहीर म्हणूनही ओळखली जाते.

दगडाचे बांधकाम असलेली ही भव्य, दिव्य बारव सुमारे ३०० वर्षांनंतरही चांगल्या स्थितीत आहे. शेतीसाठी हीच्या पाण्याचा वापर केला जातो.

महाराष्ट्रात हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढ्यात विहिरी किल्लीच्या आकाराच्या आहेत. सध्या ही विहीर दुर्लक्षित असली तरी जपणुकीसाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे बारवप्रेमींचे म्हणणे आहे.

सतराव्या शतकातील या पेशवेकालीन विहिरीचे बांधकाम चुन्याच्या मिश्रणाने केले आहे. यासाठी कोरीव काळ्याभोर दगडांचा वापर करण्यात आला आहे.

उपसलेले पाणी बाहेर जाण्यासाठी या विहिरीला दोन मोटांचे कालवे आहेत. विहिरीत उतरण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत. पहिले मोठे असून पुरेशा रुंद पायऱ्या आहेत.

विशेष म्हणजे, या विहिरीला बारमाही प्रचंड पाणी असते. त्यामुळे या विरिहीच्या खोलीचा अंदाज आजपर्यंतही लावण्यात आलेला नाही. मात्र, सात ते आठ फुट उंचीच्या एकावर एक अशा दोन ते तीन कमानी असल्याचे गणपती कुंभार आणि हेमंत बेले यांनी म्हटले आहे. सध्या ही बारव पाण्याने पूर्णपणे भरलेली असल्याने केवळ एकच कमान दिसते.

या विहिरीचे दुसरे प्रवेशद्वार अगदीच अरुंद आहे. त्याच्या पायऱ्यांवरून कमानीपर्यंत जाता येते. बारव शोध मोहिमेत शिवानंद धुमाळ, शैलेश मोरे, योगेश कुंभार, महेश मदने आदींनी भाग घेतला आहे.

विहिरीत ऐतिहासिक तपशील - विहिरीत पाणी येण्यासाठी पाच ते सहा फूट व्यासाची दोन आडवी भुयारे आहेत. सध्या विहीर तुडुंब भरलेली असल्याने आतील रचना, बांधकाम स्पष्ट होत नाही.

विहीरीतील शिलालेख, देव्हारे किंवा अन्य ऐतिहासिक तपशील खुला होण्याची गरज बारव संशोधकांनी व्यक्त केली आहे. सांगलीतील तात्यासाहेब मळ्यातही अशीच एक ऐतिहासिक विहीर आहे.