Deepika TC : "फेकलेली फळं खाऊन..."; शेतमजूर बापाची लेक वर्ल्ड चॅम्पियन, दीपिका टीसीचा संघर्षमय प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 15:40 IST2025-11-28T15:28:11+5:302025-11-28T15:40:09+5:30
Deepika TC : भारतीय संघाची कर्णधार दीपिका टीसीने आपल्या भावना व्यक्त केल्या.

रविवारी केपी सारा ओव्हल येथे झालेल्या टी-२० अंध महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळला सात विकेट्सने हरवून दमदार विजय मिळवला. अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाची कर्णधार दीपिका टीसीने आपल्या भावना व्यक्त केल्या.

दीपिकाने स्पष्ट केलं की, काही संघ स्पर्धेदरम्यान त्यांच्याविरुद्ध खेळण्यास घाबरत होते. तसेच तिने आपल्या संघावर विश्वास व्यक्त केला आणि पुरुषांविरुद्ध खेळण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे.

"आम्हाला खूप अभिमान आहे आणि हा एक मोठा विजय आहे. आमच्या संपूर्ण संघाने हे विजेतेपद जिंकण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आमचा संघ खूप मजबूत आहे आणि इतर संघ आमच्याशी खेळण्यास घाबरत आहेत. आम्ही पुरुष संघासोबतही खेळण्यास तयार आहोत" असं दीपिकाने म्हटलं.

या विजयाचं श्रेय केवळ मैदानावरील खेळाला नाही, तर कर्णधार दीपिका टीसीच्या अविचल आत्मविश्वासाला जातं. दीपिकाचा इथवरचा प्रवास सोपा नव्हता. आयुष्याच्या सुरुवातीला आलेल्या अनेक अडचणींवर मात करून तिने स्वतःला सिद्ध केलं.

दीपिका आज केवळ एक कर्णधार नाही, तर देशभरातील असंख्य तरुण मुलींसाठी त्या आशेचा किरण ठरली आहे. जेव्हा जेव्हा भारतीय संघाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला, तेव्हा दीपिकाने आपल्या संघाचं मनोधैर्य ढळू दिलं नाही.

दीपिका टीसीचं स्वप्न खूप मोठं आहे. तिला अंध महिला क्रिकेटसाठी असलेल्या सीमा तोडायच्या आहेत, जेणेकरून एक दिवस महिलांचा हा खेळ पुरुषांच्या क्रिकेटच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून उभा राहील.

दीपिका मूळची कर्नाटक राज्यातील आहेत आणि तिचा जन्म तांबळाहट्टी या गावात झाला. हे गाव कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या सीमेवर आहे. तिचे वडील शेतमजूर होते आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांच्याकडे फक्त एक एकर कोरडवाहू जमीन होती.

पाच महिन्यांची असताना एका अपघातामुळे तिच्या एका डोळ्याची दृष्टी गेली. कुटुंबीय आणि नातेवाईकांनी शिक्षण घेण्यापासून परावृत्त केलं. पण तरी तिने शिक्षण सोडलं नाही. सुरुवातीचं शिक्षण कुणीगल येथील अंध शाळेतून घेतलं.

"आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. मी खूप गरीब घरातून आली आहे. लोक खराब झालेली फळं फेकायची. आम्ही ती उचलून खराब झालेला भाग फेकायचो आणि उरलेला भाग खायचो. फेकलेली फळं खाऊन मोठी झाली"

"फक्त माझ्याच नाही तर सर्व खेळाडूंच्या घरी एक वेळेचं जेवण मिळणं देखील अवघड आहे. आजही परिस्थिती फारशी बदलली नाही. सर्वांनीच खूप संघर्ष केला आहे" असं दीपिकाने म्हटलं आहे.

शिक्षक आणि एका वरिष्ठ खेळाडूच्या प्रोत्साहनामुळे क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. २०१८ मध्ये दीपिका आरएमएसडी (RMSD) साठी पहिला क्रिकेट सामना खेळली. कर्नाटक राज्याच्या संघाचं नेतृत्व केल्यानंतर दीपिकाची भारतीय संघात निवड झाली. ती आता भारतीय संघाची कर्णधार आहे.

या ऐतिहासिक विजयामुळे भारतीय अंध महिला क्रिकेटला आता एक नवी ओळख मिळाली असून, हे निश्चितच महिला क्रिकेटच्या इतिहासातील एक अविस्मरणीय पर्व ठरलं आहे.

दीपिका टीसी आणि तिच्या टीमने मिळवलेला हा मोठा विजय, केवळ एका स्पर्धेचा शेवट नाही, तर भारतीय अंध महिला क्रिकेटच्या सुवर्णयुगाची ही दमदार सुरुवात आहे.

















